सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : तालुक्यातील राजूर कॉलनी परिसरात सुरू असलेल्या वरली मटका आणि इतर अवैध धंद्यांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी वणी पोलिसांना दोन दिवसांत कठोर कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
यावेळी निवेदन देताना शंकर बोरगलवार, सोमेश्वर ढवस, उमेश नवले, प्रवीण दुमोरे,मयुर घाटोळे, भोला चिकणकर, लकी उपरे, सूरज काकडे, धीरज बगवा, उमेश सातपुते, अमोल पारखी, मारोती सातपुते, बाळू सोनटक्के, अमोल राजुरकर यांच्यासह अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
▪️‘राजकीय’ आणि ‘पत्रकारिते’च्या नावाखाली चालतात धंदे
राजूर कॉलनी ही वणीची एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे चिंतेचा विषय बनले आहेत. या धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. यातून परिसरात अशांतता निर्माण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील अनेक अवैध धंदे चालक पत्रकारिता आणि राजकीय पदांचा वापर करून पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
▪️मनसे आक्रमक, दोन दिवसांचा अल्टिमेटम
या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणी पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले आहे. फाल्गुन गोहोकार यांनी निवेदनात म्हटले आहे की, "या अवैध धंद्यांमुळे परिसराची शांतता आणि सुव्यवस्था बिघडली आहे. पोलीस प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष घालून पुढील दोन दिवसांच्या आत कठोर आणि निर्णायक कारवाई करावी." जर यावर ठोस पाऊले उचलली नाहीत, तर राजूरचे सामाजिक सलोखा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनसे शांत बसणार नाही. यानंतर आपल्या कार्यकर्त्यांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन अवैध धंद्यांवर काय कारवाई करतात, याकडे राजूरमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.