सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणीतील महात्मा फुले अभ्यासिका केंद्राचा प्रथम वर्धापन दिन सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय खाडे होते. सपोनि विजय महाले यांची मार्गदर्शक तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत गोहोकार, पुरुषोत्तम आवारी, दिलीप मालेकर यांची उपस्थिती होती.
दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी संजय खाडे यांच्या पुढाकारातून संजय खाडे फाउंडेशन द्वारा वणीत एक अद्यावत अभ्यासिका सुरु करण्यात आली. आज या अभ्यासिकेत 180 विद्यार्थी नियमीत अभ्यास करीत आहे. अभ्यासिकेने यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण केल्यामुळे सोमवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या अभ्यासिकेत 1 वर्षात 9 विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेत. सोहळ्यात या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात संजय खाडे यांनी विद्यार्थ्यांच्या कायम पाठिशी उभे राहणार असे वचन दिले.
दर्जेदार शिक्षण देणे हाच संकल्प – संजय खाडेग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे किंवा मुंबईसारख्या शहरात जाऊन शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. हे टाळण्यासाठी मी यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात प्रथमच अद्यावत अभ्यासिका केंद्र सुरू केले. या अभ्यासिकेतून ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे. ते येथूनच मोठ्या पदांवर कार्यरत होऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे, हा माझा संकल्प आहे. जर विद्यार्थ्यांना अभ्यासादरम्यान कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत असेल, त्यांच्या अडचणी मला कळवाव्या, मी त्या नक्कीच सोडवेन!- संजय खाडे, अध्यक्ष संजय खाडे फाउंडेशन
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पीएसआय विजय महाले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वत: मधली क्षमता ओळवावी व त्या नुसार स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. संयमाने व परीश्रमपूर्वक प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळते. असा कानमंत्र त्यांनी दिला. प्रा. वैभव ठाकरे यांनी अभ्यासिका सुरु करण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की वणी येथे अद्ययावत अभ्यासिका सुरू व्हावी यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र यश येत नव्हते. अखेर संजय खाडे यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली असता त्यांनी हा प्रश्न तातडीने सोडवला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी कु. श्वेता दोडके यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सूरज जूनगरी यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांच्या स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.