सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणीतील छ. राजश्री शाहु महाराज हिन्दी विद्यालयात तीन दिवसीय शिल्प प्रदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दिनांक 18 ते 20 ऑगस्ट असे तीन दिवस ही प्रदर्शनी व कार्यशाळा चालणार आहे. हस्तशिल्प सेवा केंद्र, वस्त्र मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी या प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात शिल्पकारांनी आपली कला-कौशल्ये दाखवत विद्यार्थ्यांना शिकवली, तर विद्यार्थ्यांनीही स्वतःच्या हस्तकौशल्याने तयार केलेल्या वस्तू प्रदर्शित केल्या.
कार्यक्रमाला शिवकृपा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संजय खाडे, मुख्याध्यापक अभय पारखी, राकेश देशमुख, गजानन अलोने, अवधेश ठाकूर (सहायक निदेशक, हस्तशिल्प वस्त्र मंत्रालय) इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन समारोहात संबोधन करताना अवधेश ठाकूर म्हणाले की हा कार्यक्रम देशाच्या कला-संस्कृती आणि शिल्पकलेची ओळख करून देण्यासाठी तसेच रोजगाराचे साधन बनवण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. प्रदर्शनीत सरकारतर्फे कारागिरांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. संजय खाडे यांनी कलेच्या माध्यमातून आपण आपली संस्कृती जपताना नवीन संधी निर्माण करू शकतो; विद्यार्थ्यांना या दिशेने पाऊल टाकावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
कार्यशाळेत छत्तीसगड येथील 2 तर महाराष्ट्राती दोन कलाकार मार्गदर्शन करीत आहे. कार्यशाळेत शिल्पकला, मॉडर्न आर्ट, क्ले आर्ट, कपडा आर्ट इत्यादीचे मार्गदर्शन केले जात आहे. 100 पेक्षा अधिक विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. बुधवारी 20 ऑगस्ट रोजी समारोपी कार्यक्रमात छ. शाहु महाराज हिन्दी विद्यालयाचे सचिव ओमप्रकाश चचडा यांच्या हस्ते विद्यार्थ्याना प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे. वणीत कलेला प्रोत्साहन देणार उपक्रम राबवण्यात आल्यामुळे छ. शाहु महाराज विद्यालयाचे व शिवकृपा संस्थेचे कौतुक केले जात आहे.