सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : माझ्या संपूर्ण परिवाराचा जन्म वणी परिसरातच झालेला आहे. या मातीशी माझी नाळ जुळलेली आहे. त्यामुळे या मातीतून स्नेहाचा सुगंध येतो. हा सन्मान केवळ माझा नसून माझ्या संपूर्ण समाजाचा आहे. असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी केले. आदिवासी सोशल फोरमच्या वणी शाखेने स्थानिक शेतकरी मंदिरात रविवारी सत्कार आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक, कवी, साहित्यिक तथा ज्येष्ठ विचारवंत उत्तम गेडाम होते. सोहळ्याचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री सत्कारमूर्ती प्रा. डॉ. अशोक उईके यांनी केले. यावेळी आदिवासी सेवक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता पुष्पा आत्राम, माणिकगड सिमेटचे मॅनेजन इंजि. शैलेश सरपटवार, राष्ट्रीय संविधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष गीत घोष, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, आदिवासी फोरमचे अध्यक्ष रमेश मडावी, निळकंठ जुमनाके,गटविकास अधिकारी गजलवार, एसडीओ नितीन हिंगोले, तहसीलदार निखिल धुळधर, अशोक नागभिडकर, आशा गेडाम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना पुढे डॉ. अशोक उइके म्हणालेत, की इच्छाशक्ती आणि नियोजनाने आपण जग जिंकू शकतो. या सोहळ्यात 80 टक्के मुली आणि 20 टक्के मुलं गुणवंत असल्याचं पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. आपण आपल्या समाजाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. माझा समाज आज माझ्या पाठीशी उभा आहे. हा एक पारिवारिक सन्मान असल्यामुळे माझा आनंद द्विगुणीत झाला. ते म्हणाले की, आपण आपल्या समाजातील गुणवंतांना प्रतिभावतांना वाव द्यावा. त्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा द्यावी. आपण आपला सांस्कृतिक, बौद्धिक वारसा आणि आदर्श जिवंत ठेवला पाहिजे. तो आपल्या पुढील पिढ्यांना हस्तांतरित केला पाहिजे. आपली येणारी पिढी आपलं नाव काढेल, असं प्रत्येक गोष्टीचा नियोजन करा. आपले रीतीरिवाज जपा. मला इतिहास घडवायचा आहे याच प्रेरणेतून काम करा. याप्रसंगी त्यांना वणी शहरात आदिवासी भवनाची मागणी झाली. तेव्हा त्यांनी त्यासाठी दोन कोटी रुपयांची घोषणा केली. पुढील सन्मान आणि सर्व कार्यक्रम हे नव्या आदिवासी भवनातच घेऊ असा विश्वास दिला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात उत्तम गेडाम यांनी विविध विषयांना हात घातला. ते म्हणालेत, की धनाने श्रीमंत माणसं पावलोपावली भेटतात. पण मनाने श्रीमंत लोकांसाठी पावले झिजवावी लागतात. गुणवंतांनी यशाचे शिखर गाठण्यासाठी कुठलीही तडजोड करू नये. या कार्यक्रमात शासकीय पदांवर नव्याने रुजू झालेल्या गुणवंतांचा सत्कार झाला. त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवून काम केलं पाहिजे, असेही आव्हान त्यांनी यावेळी केलं. आदिवासी समाजातून डॉक्टर, इंजिनीयर, वैज्ञानिक, साहित्यिक घडले पाहिजेत. सत्तेत मोठ्या पदावर गेले पाहिजे. आदिवासी समाजाची मान उंचावली पाहिजे. आदिवासींची संस्कृती आणि मातृसत्ताक परंपरा ही जगाला मार्गदर्शक आहे. मानवी मूल्यांचे संतुलन करण्याची ताकद आदिवासींमध्ये आहे.
आदिवासी सोशल फोरमच्या वणी शाखेने भव्य अशा पुष्पगुच्छाने आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उइके यांचा सन्मान केला. कला, क्रीडा, शिक्षण अशा विविध क्षेत्रांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव त्यांच्या हस्ते झाला. सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी तसेच नव्याने रुजू झालेल्या यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने झाली. त्यानंतर स्वागतगीत झालं. लक्ष्मी मेश्राम हिने आदिवासी नृत्य प्रस्तुत केलं. आदिवासी सोशल फोरमचे कार्याध्यक्ष रामदास गेडाम यांनी प्रास्ताविक केलं. त्यात त्यांनी आदिवासी फोरमद्वारा चालवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन वसंत चांदेकर यांनी केले. तर आभार बी. डी. आत्राम यांनी मानले. या कार्यक्रमाला बहुसंख्य समाज बांधवांची उपस्थिती होती. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. वणीचे सांस्कृतिक व साहित्यिक अध्वर्यु माधवराव सरपटवार यांच्या निवासस्थानाला त्यांनी भेट दिली. वणीच्या सांस्कृतिक व साहित्यिक परंपरेवर तिथं सांगोपांग चर्चा केली.
आदिवासी सोशल फोरमचे अध्यक्ष रमेश मडावी, प्रमुख मार्गदर्शक उत्तम गेडाम, कार्याध्यक्ष रामदास गेडाम, उपाध्यक्ष वसंत चांदेकर, सचिव श्रीकृष्ण मडावी, कोषाध्यक्ष भाऊराव आत्राम, सहसचिव भगवान आत्राम, सहकोषाध्यक्ष प्रशांत डोनेकर, समाज समन्वयक धनंजय मेश्राम, महिला प्रतिनिधी बेबी मेश्राम, माया मरसकोल्हे यांच्यासह कार्यकारी सदस्य महिला प्रतिनिधी बिरसा मुंडा फलक समिती यांनी विशेष सहकार्य केले.