सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव तालुका अतिवृष्टी ग्रस्त घोषित करून ओला दुष्काळ जाहीर करा, पूरग्रस्त भागातील यथोचित सर्वे करून विशेष अनुदान जाहीर करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करा, या प्रमुख मागणीचे निवेदन मारेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यंना देण्यात आले आहे.
मारेगाव तालुक्यात गेल्या आठवड्यात पाच दिवसांपासून संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण तालुका अतिवृष्टी ग्रस्त झालेला आहे. विशेषत्वाने तालुक्यातील मार्डी कुंभा विभागातील वर्धा नदी काठावरील व नाल्यालगत असलेल्या सर्व शेतजमीनी खरडून गेल्याने हजारो हेक्टर शेतातील उभे पीक पूर्णतः उध्वस्त झाले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अनुषंगाने नुकसानग्रस्त शेतजमिनीचे सर्वे करून विशेष अनुदान जाहीर करावे. व तालुक्यात सध्या स्मार्ट तालुक्यातील मिटर लावण्याचा सपाटा सुरु आहे. सदर मिटरचे रिडींगच्या सपाट्यात झपाट्याने वाढ होत असुन ग्रामीन भागातील जनतेला विनाकारणचा भुर्दंड सोसावा लागत आहे. स्मार्ट मिटर लावणे बंद करण्यात यावे व तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी. या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनातून साकडे घातले.
निवेदन देताना काँग्रेस तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, कृ. उ. बा. स. सभापती गौरीशंकर खुराणा, तालुका उपाध्यक्ष शकील अहमद, जिल्हा सरचिटणीस तुळशीराम कुमरे, अंकुश माफूर, नगरसेवक आकाश बदकी, समीर सय्यद, शाहरुख शेख, रॉयल सय्यद, समिर कुळमेथे गौरव आसेकर, नयन आसूटकर आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.