Top News

जनसुरक्षा विधेयक 2025 व प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा वणीत निषेध

सह्याद्री चौफेर| ऑनलाईन

वणी राज्य सरकारने विधानसभेत सादर केलेल्या जनसुरक्षा विधेयक 2025, व संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेला हल्ला, या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ आज बुधवारी वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व पुरोगामी संघटना व राजकीय पक्ष यांचेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर संबंधित विभागामार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृह मंत्री, मा. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले.

हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. यासोबतच राष्ट्रीय सुरक्षा कायदा (UAPA), गुन्हेगारी कट (IPC 120B) व समाजविघातक कारवायांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून या हल्ल्याची चौकशी केंद्रीय यंत्रणांकडून करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या निषेधाचे निवेदन तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन वणी येथे देण्यात आले असून, परिसरातील अनेक सामाजिक संघटनांनी त्यावर स्वाक्षऱ्या करून पाठिंबा दर्शविला आहे.
ह्या प्रकारच्या विरोधी आवाजांना दडपण्याचा प्रयत्न झाला, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभं करण्यात येईल असा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला.

यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, मराठा सेवा संघ वणीचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अनिल हेपट, ॲड. कुमार मोहररम पुरी, अनिल घाटे, ॲड. अमोल टोंगे, ॲड. दिलीप परचाके, शंकर पूनवटकर, दिलीप वागदरकर, धीरज भोयर, लक्ष्मण काकडे, वसंत थेटे, सुरेंद्र घागे, बाळासाहेब खैरे, नितीन मोवाडे, कृष्णदेव विधाते, जानू अजानी, अजय कवरासे, अनिल टोंगे, भाऊसाहेब आसुटकर, पंढरी मोहितकर, पांडुरंग किन्हेकर, गजेंद्र भोयर, राहुल खारकर, प्रवीण खानझोडे, संजय तेलंग, अनिल हेपट, मारुती मोडक, मंगेश खामनकर, दिलीप भोयर, विनोद बोबडे, विलास शेरकी, दत्ता डोहे, संजय गोडे, आशिष रिंगोले इत्यादी उपस्थित होते.
Previous Post Next Post