नगरपरिषदेने रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षावर चढवला बुलडोजर; पर्यावरणप्रेमींची तीव्र नाराजी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरातील नांदेपेरा मार्गावरील रस्ते रुंदीकरणाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर वणी नगरपरिषदेकडून झाडांची बेकायदेशीर तोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. महाराष्ट्र (शहरी भागांतील) झाडांचे संरक्षण अधिनियम, 1975 अंतर्गत आवश्यक असलेल्या प्रक्रिया न पाळता ही झाडतोड करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी उपविभागीय अधिकारी , वणी यांच्याकडे तात्काळ चौकशी व कारवाईची मागणी करणारे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, झाडतोडीपूर्वी 'झाड संरक्षण समिती'कडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही, तसेच परिसरात कोणतीही सार्वजनिक सूचना न प्रसिद्ध करता ही कृती गुपचूप करण्यात आली आहे.

याशिवाय, नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी कोणताही खुला कालावधी न देता, पर्यायी वृक्षलागवडीचा आराखडा न सादर करता केलेली झाडतोड ही कायद्याचे उल्लंघन असून पर्यावरणीय समतोल धोक्यात आणणारी आहे, असे पर्यावरण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर, भविष्यात अशा बेकायदेशीर कारवायांना आळा बसावा यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात व निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

रस्त्याला कोणाचाही विरोध नाही
वणी नांदेपेरा या मार्ग नव्याने बांधल्या जात आहे. या रस्ता बांधकामाला कोणत्याही नागरिकांचा विरोध नाही. वृक्ष तोड न करता राज्यातील अनेक शहरामध्ये रस्ता बांधकाम केले आहे. तसेच जे वृक्ष आज हिरवीगार छाया देत आहे. ते वृक्ष शहरातील वृक्ष संवर्धन समितीने मोठ्या परिश्रमाने लागवड करून त्याचे संगोपन केले आहे. आज या वृक्षाची स्थिती जे आहे त्यासाठी मागील १५ ते २० वर्षाचे कष्ट आहे. ते वृक्ष असे विकासाच्या नावाखाली तोड करीत असेल आणि पर्यावरणाचा ऱ्हास करीत असेल तर हे खपवून घेतल्या जाणार नाही. काही लोक रस्त्याला विरोध म्हणून अफवा पसरवत आहे अश्या संधिसाधू लोकांपासून नागरिकांनी सावधान रहावे असे आवाहन सागर मुने यांनी केले आहे. निवेदन देतांना अभिषेक जगताप, अशोक राऊत, प्रज्योत ताकसंडे, पंकज कोल्हे व नागरिक उपस्थित होते
Previous Post Next Post