पुणे : राज्यातील सर्व शाळांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन कामकाज, आधार व अपार आयडी अद्ययावत करणे, स्कूल मॅपिंग आणि संचमान्यता दुरुस्ती यांसारखी महत्त्वाची कामे उन्हाळी सुट्टीतच पार पाडावी लागणार आहेत.
यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, लिपिक व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टीला मुकावे लागणार आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी यासंदर्भात राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, उन्हाळी सुट्टीत सर्व संबंधित शालेय कर्मचारी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत रितीने पार पाडण्यासाठी कार्यरत राहतील.
सुट्टीत करावयाची कामे:
•अकरावी प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी, पडताळणी
•विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक पडताळणी, अद्ययावत करणे
•अपार (स्थायी विद्यार्थी नोंदणी क्रमांक) माहिती सुधारित करणे
•शाळेचे स्कूल मॅपिंग आणि भूगोलविषयक माहिती अद्ययावत करणे
•संचमान्यता दुरुस्तीची कामे पूर्ण करणे
•विविध शैक्षणिक व प्रशासकीय अहवालांची पूर्तता व अपलोडिंग
सुट्ट्यांचे नियोजन फिसकटलेदरवर्षी उन्हाळी सुट्टीत मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी गावाकडे तसेच पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन करतात. मात्र, यंदा सुरवातीला अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसोबत विविध शालेय कामांची गर्दी असल्याने यावर्षी सुट्टीच्या काळातच कामे पार पाडावी लागणार आहेत. त्यामुळे अनेकांनी सुट्ट्यांमध्ये फिरण्याचे केलेले नियोजन बिघडले आहे. दीर्घकाळ सलग कामानंतर उन्हाळी विश्रांतीची गरज असताना प्रशासनाने कामाचे ओझे वाढवल्याने संबंधितांत नाराजीचा सूर उमटत आहे.