माकप च्या आमरण उपोषणाला प्रशासनाचा प्रतिसाद

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : मेंढोली येथील पारधी समाजाचा मूलभूत हक्काचा मागण्यांना घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने दिनांक 28 एप्रिल पासून मेंढोली ग्रामपंचायत समोर पारधी समाजाचा दोन पुरुष व दोन महिलांकडून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती. उपोषणाचा पहिल्याच दिवशी प्रशासनाने प्रतिसाद दिल्याने मागण्या पूर्ण होणार हे निश्चित झाले आहे. 

आमरण उपोषणाला सकाळी 11 वाजता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांच्या उपस्थितीत कॉ. मनोज काळे व कॉ. प्रकाश घोसले यांच्या नेतृत्वात मालाबाई घोसले, राजमल घोसले, अनारशा काळे, सुनिता घोसले यांनी सुरुवात केली. यावेळेस कॉ. मोहरमपुरी यांनी उपस्थित पारधी समाजातील स्त्री पुरुष बांधवांना मार्गदर्शन केले. त्याच वेळेस मेंढोली ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक ह्यांनी उपस्थिती दर्शवून पारधी कुटुंबाची घरे नियमानुकुल करून घरकुल प्रस्ताव मंजूर करून वरिष्ठांकडे पाठविल्याचे सांगितले.

मागील एक वर्षापासून पारधी समाज आपल्या मागण्या प्रशासनाकडे रेटत होते. परंतु प्रशासनाच्या धिम्या गतीचा कार्यभारामुळे पारधी समाजाचा प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. 

पारधी समाजातील 24 परिवार गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मेंढोली येथील स्मशानभूमी जवळ गट नं 36 वर झोपड्या बांधून राहत होते. जंगलात शिकार करून जगणाऱ्या पारधी समाजाने मुख्य प्रवाहात येण्यासाठी मेंढोली येथे शेती व्यवसाय करून आपली गुजराण करीत आहेत. आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून मुलांना शिक्षण देत आहेत. त्यासाठी मात्र ह्या लोकांना प्रशासनाकडून जमिनीचा हक्क, रेशन कार्ड, गाव नमुना 8 अ, घरकुलचा लाभ आदी पाहिजेत. प्राथमिक कागदपत्रे असल्याशिवाय पुढील शासकीय कागदपत्रे मिळू शकत नाहीत, परिणामी मुलांना मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेऊ शकत नाहीत. पण प्रशासन म्हणजे प्रशासनच असते. त्यासाठी शेवटी त्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेतृत्वातील आमरण उपोषणाचा धसका घेत शेवटी स्थानिक ग्रामपंचायतीने तसेच तहसील प्रशासनाचे मागण्यांची पूर्तता करीत असल्याचे व त्या दिशेने प्रक्रिया सुरू असायचे सांगितले. एवढेच नाही तर प्रक्रिया पूर्णत्वाच येत असल्याचे तहसील प्रशासनाचे वतीने उपोषण मंडपी येऊन लेखी आश्वासन मंडळ अधिकारी बांगडे यांनी देऊन आमरण उपोषण कर्त्यांना निंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
माकप च्या आमरण उपोषणाला प्रशासनाचा प्रतिसाद माकप च्या आमरण उपोषणाला प्रशासनाचा प्रतिसाद Reviewed by सह्याद्री चौफेर on April 28, 2025 Rating: 5
Powered by Blogger.