शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा आंदोलन छेडू - तालुका काँग्रेस कमिटीचे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 
 
वणी : विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले होते. आणि शेतकऱ्यांनी भरभरून मतदान करून महायुतीचे सरकार स्थापन झाले. मात्र सरकारला आता आपल्या दिलेल्या वचनांचा विसर पडत चालला की काय असेच दिसत आहे. सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केलेली नाही त्यामुळे सरकारला केलेल्या घोषणेचा विसर पडला की काय शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी कधी देणार असा प्रश्न वणी तालुका काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जाच्या डोंगराखाली दबलेला आहे. खरीप हंगाम 2025 काही महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडावर आहे व त्यांच्या समोर मोठी समस्या म्हणजे शेती करिता झालेला खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ लावला तर खर्चापेक्षा उत्पन्न कमी, असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. त्यामुळे पुढील हंगामातील शेती कशी करायची व शेतीला खर्च कसा लावायचा या विवंचनेत शेतकरी आहे. वणी झरी, मारेगाव परिसरात काँग्रेस कमिटीने दौरे करून माहिती गोळा केली असता, असे दिसून आले की परिसरातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उत्पादन खर्चात झालेली वाढ, बी - बियाणे व खताच्या किमतीत झालेली वाढ आणि शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव, शेतीकरिता मजुरांची कमतरता, परिणामी मजुरीचे दरात झालेली वाढ या कारणामुळे शेतकऱ्यांकडे घेतलेले कर्ज भरण्याची ऐपत राहिली नाही. त्यामुळे बरेच शेतकरी पुढील शेती कशी करायची बँकेचे कर्ज कसे फेडायचे, मुलीचे लग्न आणि बारा महिन्यांचा शेतीचा व प्रपंचाचा खर्च कसा चालवायचा या विवंचनेत आत्महत्येला सुद्धा सामोर जात आहे. 

महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे सरकार मायबाप सरसकट कर्जमाफीची घोषणा करेल या आशेवर शेतकरी सरकारकडे चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. तरी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी वणी तालुका काँग्रेस कमिटीचे वणी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. येत्या पंधरा दिवसात जर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली नाही तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा आंदोलन छेडू - तालुका काँग्रेस कमिटीचे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा आंदोलन छेडू - तालुका काँग्रेस कमिटीचे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on March 18, 2025 Rating: 5
Powered by Blogger.