सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा कष्टकरी वर्गाचा प्रतिनिधी करणारा पक्ष असून ह्या पक्षात निव्वळ कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याने ह्या पक्षात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते.
त्यामुळे ह्या पक्षात पक्षाचा नियमाला व शिस्तीला जास्त महत्त्व असते. पक्षात नियमानुसार सैद्धांतिक रीतीने लोकशाही पद्धतीने कामकाज चलविण्यात येते. त्याचमुळे कम्युनिस्ट पक्षात दर तीन वर्षांनी अधिवेशन होऊन संपूर्ण तीन वर्षाचा लेखाजोखा मांडून त्याचा हिशोब मांडला जातो व लोकशाही पद्धतीने टीका आत्मटिका केल्या जाऊन पुढील वाटचाल केल्या जाते. त्यासाठी पुढील तीन वर्षाचा कार्यक्रम आखून नवीन कमिटी निवडल्या जाते. हे अधिवेशन शाखा ते राष्ट्रीय स्तरापर्यंत घेतल्या जाते. यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा शाखेची, तालुक्याची आणि त्यानंतर आता ९ जानेवारी २०२४ रोज गुरुवारला वणी येथील कॉ. शंकरराव दानव सभागृह, नगाजी महाराज देवस्थान येथे जिल्हा अधिवेशन होत आहे.
या जिल्हा अधिवेशनाला शेतकरी संप फेम नेते डॉ. अजित नवले (अकोले), कॉ. किसन गुजर (नाशिक), कॉ. सुनील मालुसरे (ठाणे), कॉ. अरुण लाटकर (नागपूर) हे उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनात नियमानुसार जिल्ह्यातील निवडक स्त्री पुरुष प्रतिनिधी यांची उपस्थिती राहणार आहे, त्याच बरोबर महत्त्वपूर्ण ठराव पारित करून त्याच्या अंमलबजावणीचा कार्यक्रम व रूपरेषा ठरविली जाणार आहे.