राळेगाव : वडीलोपार्जित जुन्या घराच्या मिळकत पत्रिकेवरून मृत आईचे नाव कमी करण्यासाठी १० हजारांची लाच मागणाऱ्या परिरक्षण भूमापकास लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवार दि. ६ जानेवारीला राळेगाव भूमी अभिलेख कार्यालयात ही कारवाई केली.
अजय नारायण देशमुख (वय ५०) असे अटक केलेल्या परीरक्षण भूमापकाचे नाव आहे. ते राळेगाव येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत होते. वडीलोपार्जित जुन्या घराच्या मिळकतीवरील मृत झालेल्या आईचे नाव मिळकत पत्रिकेवरून कमी करण्याची मागणी तक्रारदाराने आरोपीकडे केली होती. मात्र, त्यासाठी अजय देशमुख यांनी तक्रारदाराला १० हजार रुपये लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने या प्रकाराची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दि. ३ जानेवारीला केली होती. लेखी तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. ६ जानेवारीला राळेगाव भूमीअभिलेख कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच पकडण्यात रंगेहात आले. त्यांच्याविरुध्द राळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक मारूती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट आणि पोलीस अंमलदार पोहवा अतुल मते, अब्दुल वसीम, पोना सचिन भोयर, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, गोवर्धन वाढई व संजय कांबळे यांनी केली.