मारेगाव : जमादार अफजल पठाण यांचे दुःखद निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मारेगाव पोलिस स्टेशन येथे जमादार पदावर कार्यरत असलेले अफजल शब्बीर पठाण यांचे आज (दि. 31 जाने.) ला दुपारी 2 वाजताच्या दरम्यान नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 42 वर्ष होते. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण पोलिस दलासह स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून अफजल शब्बीर पठाण पोटाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांचेवर यवतमाळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते, तिथे 10 ते 12 दिवसांच्या उपचारांनंतर ते बरे झाले होते. मात्र, काही दिवसांनंतर त्यांचा आजार पुन्हा बळावला.त्यामुळे त्यांना नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे 15 दिवसांपूर्वी त्यांचे मोठे ऑपरेशन करण्यात आले. प्रकृती सुधारत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अफजलखान पठाण मेहनती, कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलिस कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता, त्यामुळे ते सर्वसामान्य नागरिकांमध्येही आपलंस करणारे व्यक्तिमत्व होते. मारेगावसह पांढरकवडा व पुसद येथेही त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मोठा शोक व्यक्त करण्यात येत आहे. 

अफजल पठाण यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांचे पार्थिवावर उद्या शनिवार (दि. 1 फेब्रुवारी) त्यांच्या मुळगाव पुसद येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पाठीमागे आई-वडील, पत्नी आणि चार मुली असा आप्त परिवार आहे.


मारेगाव : जमादार अफजल पठाण यांचे दुःखद निधन मारेगाव : जमादार अफजल पठाण यांचे दुःखद निधन Reviewed by सह्याद्री चौफेर on January 31, 2025 Rating: 5
Powered by Blogger.