सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
जिल्हाधिकारी तथा जिल्हा बालकामगार कृतीदल प्रमुख डॉ. पंकज आशिया यांच्या निदेर्शान्वये कामगार उपआयुक्त नितीन पाटणकर, सरकारी कामगार अधिकारी रा.रा. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वणी येथे धाड टाकण्यात आली. धाडीमध्ये एनी टाईम बाईक पॉइंट येथे १८ वषार्खालील एक बालक काम करतांना आढळून आला. बालकास
मुक्त करून बालकल्याण समितीकडे त्यास सुपूर्द करण्यात आले आहे. धाडीमध्ये एनी टाईम बाईक पॉइंटचे मालक वजीर खान मोहम्मद जफीर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १४६,अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा २०१५ च्या कलम ७५, ७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम, १९८६ सुधारणा २०१६ अंतर्गत कलम ३,३ अ मध्ये स्वतंत्र खटला दाखल करण्याची कार्यवाही सुध्दा करण्यात येत आहे.
धाडीमध्ये दुकाने निरीक्षक विजय गुल्हाने, महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे आकाश बुरेर्वार, आरोग्य विभागाचे प्रविण मेश्राम, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक दिपक आटे, होमगार्डचे निरंजन मलकापुरे, पोलिस विभागाचे रामेश्वर तिळेवाड,ग्रामिण समस्या मुक्ती ट्रस्टचे अशोक बगाडे, कामगार विभागाचे किसन जाधव यांनी सहभाग घेतला होता. बालकामगार ही अनिष्ट प्रथा बंद व्हावी व जिल्हा बाल कामगारमुक्त व्हावा याकरीता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बालकामगार कृतीदलाच्या वतीने धाडी टाकल्या जातात. जिल्ह्यामध्ये बालकामगार ठेवणाऱ्या आस्थापनाधारकांविरुध्द कडक कायदेशिर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही आस्थापना मालकांनी बालकांना कामावर ठेवू नये, असे आवाहन जिल्हा बालकामगार कृतीदल समितीद्वारे करण्यात आले आहे.
वणी येथे जिल्हा बालकामगार कृती दलाची धाड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 14, 2025
Rating: