विधानसभा क्षेत्रातील सोयाबीन नोंदणी, खरेदी त्वरित सुरू करा


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वणी, मारेगाव, झरी या तिन्ही तालुक्यातील नाफेड मार्फत करण्यात येणारी सोयाबीन खरेदी बंद करण्यात आली. तसेच नोंदणी देखील दिलेल्या वेळेच्या दोन दिवस आधीच बंद करण्यात आली. त्यामु़ळे हजारों शेतक-यांची नोंदणी रखडली. नोंदणी अभावी व खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचा सोयाबीन घरीच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देत सोयाबीनची खरेदी व नोंदणी त्वरित करण्याची मागणी केली आहे. 

खरेदी विक्री संघ हे नोडल एजन्सी म्हणून नाफेडसाठी शेतमाल खरेदी करते. नाफेडमार्फत दिनांक 6 जानेवारी पर्यंत ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू राहिल असे जाहिर करण्यात आले होते. परंतु ही नोंदणी 2 दिवस आधीच पोर्टल बंद झाले. वणी तालुक्यातील ३९७७ शेतक-यांचे अर्ज आले. त्यापैकि फक्त २९०३ शेतक-यांची 4 जानेवारी पर्यंत ऑनलाईन नोंदणी झाली. उर्वरित १०७४ शेतक-यांची पोर्टल बंद झाल्यामुळे नोंदणी रखडली. शेतक-यांनी कार्यालयात ऑफलाईन अर्ज जमा केले. परंतु नोंदणी अद्यापही रखडलेली आहे. 

 मारेगाव तालुक्यातील १५२० शेतक-यांचे अर्ज आले. त्यापैकि ७७० शेतक-यांची नोंदणी झाली. उर्वरित ७५० शेतक-यांची नोंदणी व्हायची आहे. तसेच झरी तालुक्यातील २०१० शेतक-यांचे अर्ज आले. त्यापैकी १९१२ शेतक-यांची ऑनलाईन नोंदणी झाली. उर्वरित ९८ शेतक-यांची नोंदणी अद्यापही बाकि आहे. नोंदणी रखडलेल्या शेतकऱ्यांचा एकूण आकडा हा १९२२ आहे. यासह अनेक शेतकरी पोर्टल बंद झाल्यामुळे खरेदी विक्री संघापर्यंत नोंदणी करण्यासाठी पोहोचू शकले नाही. 

जगाच्या पोशिंद्याच्या नशिबी फक्त थट्टाच - संजय खाडे 
दोन दिवस आधीच पोर्टल बंद करण्यात आहे. ३५०० च्या वर शेतक-यांना याचा फटका बसत आहे. खुल्या मार्केट मध्ये भाव खूप कमी आहे. शेतकऱ्यांच्या घरी शेतमाल पडून असला तरी शेतकऱ्यांसोबत थट्टा सुरूच आहे. 

सरकारने त्वरित सोयाबीनची खरेदी व नोंदणी सुरू करावी. शेतक-यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा संजय खाडे यांनी दिला आहे. निवेदन देताना अशोक चिकटे, प्रशांत गोहोकार, तेजराज बोढे, पुरुषोत्तम आवारी, रोहन ठाकरे, संजय शेंडे इत्यादींची उपस्थिती होती.
विधानसभा क्षेत्रातील सोयाबीन नोंदणी, खरेदी त्वरित सुरू करा विधानसभा क्षेत्रातील सोयाबीन नोंदणी, खरेदी त्वरित सुरू करा Reviewed by सह्याद्री चौफेर on January 31, 2025 Rating: 5
Powered by Blogger.