सह्याद्री चौफेर | वृतसंस्था
मारेगाव : तालुक्यात आत्महत्येच्या घटनेत दिवासेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. याबाबत जनजागृती होणे गरजेचे असून आत्महत्येची धग थांबता थांबत नाहीये. जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यातील आत्महत्याचा आकडा फुगत आहे.
तालुक्यातील कोलगाव येथील युवा शेतकरी विशाल अरविंद अवताडे (अंदाजे 30) याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार च्या रात्री 8 वाजता घडली. कर्जाच्या ओझाने विशाल अस्वस्थ असायचा अशी चर्चा ऐकीवात असून, त्याने किटकनाशक द्रव्य प्राशन केले व जगाचा निरोप घेतला. दरम्यान, घटनेच्या दिवशी त्याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यानंतर पुढील उपचारार्थ यवतमाळ येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विशाल च्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत असून त्याच्या पाठीमागे आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.
मारेगाव तालुका हादरला :
गेल्या काही दिवसापासून मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत आत्महत्या सारख्या घटनेच्या मालिका सुरुच असून याचा आलेख दिवसागणिक वाढतच आहे. तालुक्यातील पिसगाव (पांढरकवडा) येथील आशिष दिगंबर आस्वले (32) याने दिनांक 5 ऑक्टोबर रोजी राहत्या घरी विष प्राशन करून त्याने जीवन संपवले. त्याचेकडे एक हेक्टर शेती आहे. त्यानंतर कुंभा येथील रहिवाशी मात्र, दीड दोन वर्षांपासून मजरा येथे आई च्या माहेरी राहत असताना रुपेश शामसुंदर आत्राम (30) याने दिनांक 9 ऑक्टोबर रोजी मार्डी येथे विषारी द्रव्य प्राशन केले. तसेच तालुक्यातील डोंगरगाव वेगाव शिवारात संतोष लटारी धोटे (40) यांनी शेतामध्ये झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना याच महिन्यातील 10 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. आणि काल विशाल अरविंद अवताडे याने विष प्राशन केले. त्यामुळे सातत्याने होत असलेल्या घटनेने मारेगाव तालुका हादरला आहे. ही गंभीर बाब असून तालुक्यातील शेतकरी आत्महत्या कशा रोखता येईल यासाठी प्रशासनस्तरावरुन जनजागृतीची मोहीम राबविणे गरजेचे असल्याचे सुजाण नागरिकांतुन बोलल्या जात आहे.
मारेगाव तालुक्यात आत्महत्येच्या मालिका सुरूच...!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 16, 2024
Rating: