सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था
वणी : होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आज उद्याच्या घरात लागणार असून, विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. वणी विधानसभा क्षेत्र हे पारंपारिक महायुतीकडून भाजप व महाविकास आघाडी कडून काँग्रेस पक्षासाठी सुटणाऱ्या सीट आहेत. सद्यस्थितीत दोन्ही पक्षाकडून आमदारकीसाठी इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर असलेली गर्दी, आता बोटावर मोजण्याइतपत नागरिकांना पाहायला मिळत आहे.
भाजपकडून विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तारेंद्र बोर्डे, सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया, विजय पिदूरकर, तर काँग्रेसकडून संजय खाडे, अरुणा खंडाळकर, टिकाराम कोंगरे हे आमदारकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत. या इच्छुक उमेदवारांच्या नावाची चर्चा विधानसभेमध्ये जोरदार प्रमाणात सुरू आहे. दोन्ही पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती पक्षश्रेष्ठींद्वारे घेण्यात सुद्धा आल्या असून, नेमकं पक्षश्रेष्ठी कोणावर मेहरबान होणार ? आणि यावेळेस विधानसभेचं तिकीट कुणाच्या पारड्यात टाकणार ? याकडे मतदासंघातील जनतेचे लक्ष लागले आहे. दोन्ही पक्षाचे इच्छुक उमेदवार आपापल्या परीने मतदार संघातील जनतेपर्यंत पोहोचत आहेत. आत्तापर्यंतचे केलेले कार्य आणि मतदारसंघासाठी काय करणार? या गोष्टी नागरिकांना समजावून सांगत आहेत. विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर, वणी मतदारसंघातील राजकीय आखाडा मात्र गरम होणार.
राजकीय रणधुमाळी चांगलीच रंगणार. मतदार संघासाठी निर्णायक ठरणारा आदिवासी समाज या समाजाची आजवरची परिस्थिती पाहता येथील नागरिक यावेळेस नेमकी कोणती भूमिका घेणार ? आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेला कुठल्या पक्षाचा उमेदवार येथील नागरिकांना विश्वासाने आश्वासित करणार? हे सुद्धा महत्त्वाचे आहे. काँग्रेसकडून इच्छुक असलेले संजय खाडे यांनी सध्यातरी मतदारसंघात आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मतदारसंघातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आकर्षित होत असल्याचे चित्र सध्यातरी आहे. भाजपकडून मात्र, अजून तरी कुठल्याच हालचाली दिसत नसून, भाजपा कोणती निर्णायक खेळी खेळणार ? याकडे सुद्धा नागरिकांचे लक्ष लागले आहे.