महिलेला अडीच लाखाची मागणी व अश्लील फोटो वायरल करण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील एका 40 वर्षीय कर्मचारी महिलेला ब्लॅकमेल करत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. महिलेला अडीच लाखाची वारंवार मागणी व अश्लील फोटो वायरल करण्याची धमकी त्याने देताच पिडीत महिलेने पोलिसात त्याच्या विरुद्ध तक्रार नोंद केली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्याने घेत आरोपी सुरेंद्र पाचभाई याच्या वर गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील एका महिलेच्या मोबाईल वर काही दिवसांपूर्वी अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर त्यांच्यातील संवाद वाढतच गेला. अनोळखी व्यक्तीच्या शब्दांच्या जाळ्यात ही महिला अलगद अडकली. नंतर त्या व्यक्तीचे तिला वारंवार कॉल येऊ लागले. कॉल वरील संवादातून त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. कालांतराने त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण होऊन ते अगदीच घट्ट झालं. मात्र, त्या "कॉल बॉय" च्या मनात काही वेगळीच खिचडी शिजत होती. 

अशातच त्याने महिलेकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली. परंतु महिलेने पैसे देण्यास नकार दिल्याने. शेवटी त्याने महिलेला ब्लॅकमेल करणे सुरु केले. "तुझे मी काही अश्लील फोटो तयार केले आहेत, ते मी तुझ्या नातेवाईकांना पाठवतो व समाज माध्यमांवर व्हायरल करतो", अशी त्याने महिलेला धमकी दिली. तरुणाच्या या धमकीने महिला चांगलीच चक्रावली. धास्तावलेल्या महिलेला काही कळेनासे झाले. 

पैशासाठी कॉल बॉय हा तिच्याकडे वारंवार पैशाचा तगादा लावू लागला. शेवटी त्याच्या रोजच्या जाचाला कंटाळून महिलेने तरुणाविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्या सुरेंद्र पाचभाई रा.कातलाबोडी ता. कोरपना जि. चंद्रपूर या आरोपीवर बीएनएसच्या कलम 308 (3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
महिलेला अडीच लाखाची मागणी व अश्लील फोटो वायरल करण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल महिलेला अडीच लाखाची मागणी व अश्लील फोटो वायरल करण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल Reviewed by सह्याद्री चौफेर on September 02, 2024 Rating: 5
Powered by Blogger.