सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : शहरातील रस्त्यालगत असलेले शेकडो वृक्ष तोडणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी निवेदनातून उपविभागीय पोलिस अधिकारी, वणी व उपअभियंता बांधकाम विभाग, वणी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.
वृक्ष लागवड करणे, ही काळाची गरज असल्याने शहरातील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग पासून कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंतच्या भागातील वृक्ष संवर्धन समिती तर्फे गेल्या 14 वर्षांपूर्वी वृक्ष लागवड मोहीम राबविली होती. सर्वच झाडांचे संगोपन करत झाडे नागरिकांनी वाढवली; मात्र 2022 साली चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग पासून कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम मंजूर झाले. काम सुरु झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा असलेले सगळे वृक्ष तोडण्यात आले. परंतु संबंधित ठेकेदाराने तोडलेल्या झाडांची लावगड केली नाही. त्यामुळे संपूर्ण शहरात रस्त्याच्या कडेला एकही झाड उरले नाही. परिणामी उष्मघाताने अनेकांचा मृत्यू होत आहे. दिवसेंदिवस प्राणवायूची कमतरता भासत आहे. अशातच पारा 45 च्या वर चढत आहे. तूर्तास वातावरणात झालेला हा बदल वृक्ष तोडीने झाला आहे. असा थेट आरोप देखील अजिंक्य शेंडे यांनी केला असून रस्त्याने चालणाऱ्याला झाडांची सावली शोधावी लागत आहे असेही त्यांच म्हणणं आहे. मायेनं वाढविलेल्या झाडाची कत्तल करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल, युवासेना व परिसरातील वृक्षप्रेमींतर्फे वन विभाग वणी, मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ, उपवन संरक्षक पांढरकवडा वनविभाग, उपअभियंता बांधकाम विभाग, वणी, उपविभागीय पोलिस अधिकारी, यांना देण्यात आले. तसेच आता समोर पावसाळा आहे या पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या कडेला झाडे लावण्यात यावी, अशीही मागणी दिलेल्या निवेदनातून युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी केली असून येत्या 15 दिवसांच्या आत संबंधितावर कारवाई करण्यात न आल्यास युवासेना आपल्या स्टाईलने आंदोलन करणार असा गर्भीत ईशाराही देण्यात आला आहे.