सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मौजा चोपण येथील गावात असलेल्या सुबाभळीच्या झाडावर वीज पडली. सुदैवाने तेथे कोणीही नसल्याने जिवीतहानी टळली. या घटनेने मात्र नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यात सध्या सगळीकडे अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. पावसासोबत वादळ वारा आणि विजेनेही आकांडतांडव माजवलेले आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात आज दुपारी अडीचच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. पावसाला जरी जोर नसला तरी विजांचा कडकडाट मात्र चांगलाच होत होता. शेतातील मजूर जिवाच्या आकांताने लगबगिने घरी परतत होते. अशातच चोपणला लागूनच असलेल्या बंडु खिरटकर यांच्या खाली जागेवर असलेल्या सुबाभळीच्या झाडावर वीज कडकडाटासह पडली. झाडाजवळ असलेल्या काही घरच्या व्यक्तींना काही काळ काहीच समजले नाही. विजेचा झटकाच एवढा होता की काही घरचे विद्युत उपकरणे निकामी झाल्याची चर्चा आहे.
सुबाभळीच्या झाडावर वीज पडल्यानंतर त्या झाडाच्या निघालेल्या झीलप्या बाजूलाच असलेल्या थेरे यांच्या घरी पडल्या. वीज पडली तेव्हा त्या ठिकाणी लख्ख प्रकाश पडला होता. सुदैवाने पावसाला सुरवात झाली होती त्यामुळे त्याठिकाणी कोणीही नसल्याने जिवीतहानी टळली. अनेक वर्षानंतर गावामध्येंच वीज पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
चोपणमध्ये सुबाभळीच्या झाडावर पडली वीज; सुदैवाने जिवीतहानी नाही
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 12, 2024
Rating: