देशात हुकूमशाहीचा उदय झाल्याने येत्या निवडणुकीत हुकूमशाह भाजपला पराजित करणे काळाची गरज- कॉ. उदयन शर्मा
सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉ. शंकरराव दानव यांचे अकस्मात निधनानंतर पक्षाची पहिली जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची विस्तारित बैठक वणी येथे दि. ७ फेब्रु. ला घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या बैठकीला आलेले पक्षाचे राज्य कमिटी सदस्य कॉ. उदयन शर्मा हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी देशातील परिस्थितीवर बोलताना सांगितले की, देशात संविधनिक व्यवस्थेला बाजूला सारून भाजपच केंद्र सरकारने सर्वच घटनात्मक संस्थेला भाजपमय केले असून ईडी, निवडणूक आयोग, सीबीआय, न्यायालय व संसद ह्याचा वापर आपल्या इशाऱ्यावर करून लोकशाही समर्थकांना तसेच विरोधकांना संपविण्याचा घाट रचला आहे. त्यांनी उदाहरण देत सांगितले की, इडीचा वापर विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्यासाठी केला जातो आहे तर न्यायालयात मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत असून सर्वोच्च न्यायालय ऐकून घ्यायला तयार नाही तर दुसरीकडे निवडणूक आयोगाचे खाच्चिकरण करण्यासाठी व आपला हस्तक नियुक्त करण्यासाठी नियुक्तीची पद्धत बदलवून टाकली आहे. सरकार, त्यांचे मंत्री व एक विरोधी पक्ष नेता ही पद्धत अवलंबित आहे. आधी मंत्र्यांचा जागेवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे होते. त्यामुळे निवडणूक आयुक्त मनमर्जिने नाहीतर प्रक्रियेतून बनविल्या जात असे. त्याचप्रमाणे सत्यता लपविण्यासाठी लोकशाहीचा चौथ्या स्थंभाला गोदी मीडिया करून टाकले आहे. शेतकऱ्यांचा विरोधात काळे कायदे करणे, कामगार कायदे रद्द करून मालक धार्जिणे नवीन चार संहिता आणणे, संसदेमध्ये विरोधकांना बोलू न देणे, विरोधकांना संसदेतून निलंबित करणे, २-२ मिनिटात जनविरोधी कायदे पास करणे, आयपिसी, सी आर पी सी, एविडन्स ॲक्टचा जागेवर नवीन कायदे आणणे, दंडा मध्ये भरमसाठ वाढ करणे हे सर्व देशात हुकूमशाही सुरू झाल्याचे लक्षण आहे.
त्याचप्रमाणे सर्वच जन कल्याण योजनांना कात्री लावून मूठभर भांडवलदारांना सर्व सवलती देऊन त्यांची कर्जे माफ करणे ह्यामुळे देशात अब्जाधीशांचा संपत्तीत वाढ झाली असून १ टक्के श्रीमंतांचा ७३ टक्के साधनांवर कब्जा झाला आहे. तर दुसरीकडे देशात प्रचंड गरिबी, भुखमरी, वाढली असून ८० कोटी लोकांना मोफतचा रेशनवर जगावे लागत आहे. असे प्रतिपादन करीत कॉ. शर्मा यांनी देशातील भाजप सरकारची हुकूमशाही संपवायची असेल तर येत्या लोकसभेचा निवडणुकीत भाजपचा पराजय करून मोदी सरकारचा पायउतार करणे आवश्यक आहे व त्यासाठी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी कंबर कसली पाहिजे असे आवाहन केले.
ह्या विशेष विस्तारित बैठकीत कॉ. शंकरराव दानव यांची २१ फेब्रुवारीला सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा घेणे, जिल्ह्यात अस्थिकलश यात्रा काढणे व वणी येथे कॉ. शंकरराव दानव भवन चे निर्माण करणे आदी निर्णय घेण्यात आले.
या विशेष विस्तारित बैठकीचे अध्यक्ष स्थानी कॉ. डी.बी.नाईक हे होते. कॉ. उदयन शर्मा व्यतिरिक्त जिल्हा सचिव कुमार मोहरमपुरी, एड. दिलीप परचाके, माजी जि.प. सदस्य देविदास मोहकर, अनिता खुनकर, मनीष इसाळकर, चंद्रशेखर सिडाम, रमेश सोनुले, मनोज काळे आदींनी विचार मांडले. यावेळेस कलावती शंकरराव दानव, सरिता दानव, सदाशिव आत्राम,निरंजन बोधलकर, कवडु चांदेकर, गजानन ताकसांडे, सुधाकर सोनटक्के, नंदू बोबडे, शंकर गाउत्रे, अरुण चिंचोलकर, संदीप मोहुरे, संजय वालकोंडे ,एकनाथ नालमवार, संदीप सुरपाम, धावस, राजमल घोसले तसेच जिल्ह्यातील प्रमुख पुरुष व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
देशात हुकूमशाहीचा उदय झाल्याने येत्या निवडणुकीत हुकूमशाह भाजपला पराजित करणे काळाची गरज- कॉ. उदयन शर्मा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 08, 2024
Rating: