केंद्र शासनाच्या हमी भावानुसार कापूस खरेदी सुरू करा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सध्या बाजारपेठेतील दर हे हमी दरापेक्षा कमी आहेत. परिणामी शेतक-याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या आधारभूत दरानुसार वणी विभागांतर्गत कापूस खरेदी करावी, अशी मागणी कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादन पणन महासंघ, मुंबई यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिले आहे. 
केंद्र शासनाने हंगाम 2023-24 साठी कापसाला हमी भाव जाहीर केला आहे. मात्र हमी भावापेक्षा कमी दराने सध्या कापूस खरेदी सुरू आहे. वणी व परिसरात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली जाते. मजुरांची कमतरता, खते, बि-बियाणे इत्यादी यामुळे कापूस उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्या तुलनेत कापसाला मिळणार भाव हा अत्यल्प आहे. परिणामी शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कमी भावामुळे अनेक शेतकरी आत्महत्येचे पाऊल देखील उचलत आहेत.
वणी केद्रावर, मारेगाव तालुक्यातील मारेगाव व मार्डी केंद्रावर, झरी (जामणी) तालुक्यातील मुकुटबन तसेच केळापूर तालुक्यातील पांढरकवडा या केंद्रावर त्वरित केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार कापूस खरेदी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संजय खाडे, पुरुषोत्तम आवारी, राजाभाऊ पाथ्रडकर, जयसिंग गोहोकर, प्रमोद वासेकर, सुनील वरारकर, प्रा. शंकर व-हाटे, महेश पावडे, तेजराज बोढे, बंडू मालेकर इत्यादी उपस्थित होते.


केंद्र शासनाच्या हमी भावानुसार कापूस खरेदी सुरू करा केंद्र शासनाच्या हमी भावानुसार कापूस खरेदी सुरू करा Reviewed by सह्याद्री चौफेर on January 24, 2024 Rating: 5
Powered by Blogger.