सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : वणीच्या इतिहासातील २ जानेवारी १९७४ हा दिवस काळा दिवस म्हणून गणल्या जातो. कारण ह्या दिवशी वणी मध्ये महागाई चे विरोधात काढल्या गेलेल्या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला आणि ह्यामध्ये ७ निरपराध लोकांचा बळी गेला व ते हुतात्मे झाले.
ह्या दिवशी दरवर्षी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते काम्रेड शंकरराव दानव ह्यांच्या कडून ह्या महागाई विरोधात झालेल्या आंदोलनात हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते. या वर्षी सुद्धा काम्रेड शंकरराव दानव यांचे वतीने लोकमान्य टिळक चौकात असलेल्या हुतात्मा स्मारक ठिकाणी पुष्पहार अर्पण करून व मौन राखून वणी येथील महागाई विरोधी आंदोलनातील हुतात्मे ठरलेल्याना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आज ज्या प्रमाणे आपण सर्वजण महागाई वर बोलत असतो, महागाईत जनमानस होरपळत असताना मात्र महागाई वर आंदोलन करीत नाही, त्यामुळे शासन ह्या संदर्भात पावले सुद्धा उचलत नाहीत. परंतु १९७४ ला वणी मध्ये विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र येत २ जानेवारी १९७४ ला भव्य मोर्चा काढण्याचे ठरविले. परंतु पोलीस प्रशासनाने ह्या आंदोलनातील नेत्यांना आधीच अटक करून घेतली. ह्याचा परिणामी जनता भडकली व पोलीस ठाण्यावर जायला लागली. जनतेचे उग्र रूप बघता पोलिसांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. ह्यामध्ये ७ लोकांचा बळी गेला. तत्कालीन त्या आंदोलनाचे एक नेते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कामरेड शंकरराव दानव ती घटना सांगताना आजही हादरून जातात. त्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी २ जानेवारीला टिळक चौकातील त्या हुतात्मा स्मारकावर जाऊन माकप तर्फे अभिवादन करण्यात येते.
यावेळेस मारोतराव पुंड, केशव लेनगुरे,नारायण लोहकरे, विष्णू दानव, संजय सुतसोनकर, राधेश्याम कुरील व चौकातील अन्य गणमान्य उपस्थित होते.
गोळीबाराची पन्नास वर्षे, वणीच्या इतिहासातील काळा दिवस
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 02, 2024
Rating: