सरकारी कर्मचाऱ्यांची चंगळ; सुट्ट्यांची मजाच मज्जा !

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांना यंदा 24 सार्वजनिक सुट्ट्या शासनाने अधिसुचित केल्या होत्या. मात्र यंदा गुरुवार (दि.28) रोजी अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद हे सण एकाच दिवशी येत आहेत. त्यामुळे हिंदू-मुस्लीम समाजात शांतता रहावी म्हणून ईद-ए-मिलाद सणाची सुट्टी शुक्रवार (दि.29) रोजी जाहीर केली आहे. त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार रोजी सलग दोन दिवस सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार आहे. त्यानंतर रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने  गुरुवारपासूनच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुट्ट्यांची चंगळ असणार आहे.

अधिसुचनेत म्हटले आहे की, राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी गुरुवार (दि. 28) रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तथापि यावर्षी गुरुवार, (दि.28) रोजी हिंदु धर्मियांचा अनंत चतुर्दशी हा सण आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश मुर्तीची मोठी मिरवणूक काढण्यात येते व नंतर तिचे विसर्जन करण्यात येत असल्याने हिंदु बांधवांची मोठी गर्दी जमा होत असते. यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी ही गुरुवार ऐवजी शुक्रवार, (दि. 29) रोजी जाहीर करण्यात येत असल्याची सामान्य प्रशासन विभागाने अधिसुचना काढली आहे.

त्यामुळे गुरुवार पासून रविवारच्या साप्ताहिक सुट्टीपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्ट्या असणार आहेत. मधला शनिवार सोडला तर तीन दिवस कर्मचाऱ्यांना या आठवड्यात शेवटी सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे सुट्ट्याची मज्जा सरकारी कर्मचाऱ्यांना करता येणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांची चंगळ; सुट्ट्यांची मजाच मज्जा ! सरकारी कर्मचाऱ्यांची चंगळ; सुट्ट्यांची मजाच मज्जा ! Reviewed by सह्याद्री चौफेर on September 27, 2023 Rating: 5
Powered by Blogger.