"गाई पाळा अनुदान मिळवा"; सरकारने सुरू केली 'ही' योजना..!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

गोशाळेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने "गोवर्धन गोवंश सेवा केंद्र'" ही योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेत काही प्रमाणात बदलदेखील केले आहेत. गाई पाळण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गोशाळांना अनुदान देण्याची योजना सरकारने यंदा पुन्हा सुरू केली असून याअंतर्गत राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गोशाळेला किमान १५ लाख, २० लाख आणि कमाल २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेद्वारे सरकारकडून 'गाई पाळा, अनुदान मिळवा', असा संदेश दिला आहे.

मागील काही वर्षांपासून ही योजना बंद होती. मात्र, गोशाळेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ही योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेत काही प्रमाणात बदलदेखील केले आहेत. त्यामध्ये अधिकृत नोंदणी असलेल्या आणि किमान तीन वर्षांचे ताळेबंद सादर करू शकणाऱ्या गोशाळांना गाईंच्या एकूण संख्येच्या प्रमाणात अनुदान दिले जाणार आहे.

त्यानुसार किमान ५० ते १०० गाईंचे पालन करणाऱ्या गोशाळांना प्रत्येकी १५ लाख, १०० ते २०० गाईंचे पालन करणाऱ्या गोशाळांना २० लाख तर २०० हून अधिक गाईंचे पालन करणाऱ्या गोशाळांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

दरम्यान, दुग्धोत्पादन, शेती काम, ओझी वाहण्याच्या कामास उपयुक्त नसलेल्या अथवा असलेल्या गाय, वळू, बैल व वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करणे, या पशुधनासाठी चारा, पाणी व निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणे, गोवर्धन गोवंश सेवा केंद्रामधील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणीसाठी वैरण उत्पादन कार्यक्रम राबविणे, गोमूत्र, शेण आदींपासून विविध उत्पादने, खत, गोबरगॅस व इतर उपपदार्थांच्या निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी पुन्हा नव्याने गोशाळांना अनुदान देण्याची योजना सरकारने सुरू केली आहे.

या योजनेतून अनुदानाचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांना येत्या १९ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. या योजनेचा अर्ज व इतर माहिती पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे मिळू शकेल. अनुदान मागणीचे अर्जही पंचायत समित्यांकडेच सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

असे आहेत लाभार्थीचे निकष
◆ संस्थेस गोवंश संगोपनाचा तीन वर्षांचा अनुभव
◆ धर्मादाय आयुक्तांकडे संस्थेची नोंदणी आवश्‍यक
◆ तीन वर्षांचे लेखापरीक्षण आवश्‍यक
◆ पशुधनाच्या देखभाल, चाऱ्यासाठी स्वत:च्या उत्पन्नाचे साधन हवे.


"गाई पाळा अनुदान मिळवा"; सरकारने सुरू केली 'ही' योजना..! "गाई पाळा अनुदान मिळवा"; सरकारने सुरू केली 'ही' योजना..! Reviewed by सह्याद्री चौफेर on July 07, 2023 Rating: 5
Powered by Blogger.