पशुपक्षासाठी पाणी आणि धान्याची व्यवस्था करावी- युवा पत्रकार कुमार अमोल

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सध्या सर्रास वृक्षांच्या कत्तली होतांना दिसत आहे. सगळीकडे सिमेंटची जंगले उभी राहिलीत. पक्ष्यांचा हक्काचा निवाराच राहिला नाही. आता सर्वत्र रस्त्याच्या कडेला मोजकी झाडे आहेत, आहेत ती झाडे आता उन्हामुळे निष्पर्ण होत चालली आहेत. याचा मोठा परिणाम पशुपक्ष्यांना जगण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. यामुळे पशुपक्ष्यांसाठी सर्वांनी पुढाकार घेऊन घराच्या छतावर अथवा खिडकीमध्ये पाणी आणि खाण्याची व्यवस्था करावी असे पक्षीप्रेमींकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मागील पाच दिवसापासून हिट वेव्ह आल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास होत आहे. तापमान दर दिवशी वाढत असून 42 अंशाच्या वर गेल्याने अंगाची लाही लाही होत आहे. दर दिवशी उन्हाचा पाढा चढत असल्याने उष्माघाताच्या रुग्णसंख्येत देखील मोठी वाढ होत आहे. उन्हाळा म्हणजे जीवाची काहिली करणारा. आसपास दमट वातावरण होत कोरडे पडत चाललेले जलसाठे या सगळ्यांचा परिणाम संपूर्ण सृष्टीवर जाणवतेय. मग पक्ष्यांची आणि प्राण्यांची कथा ती काय, सिमेंटच्या जंगलात थेंबभर पाण्यासाठी तळमणारे पक्षी आणि पाण्याच्या एका घोटासाठी भरकटणारे पशू पाहिले की अंगावर काटा येतो. पशुपक्ष्यांनी पाण्यासाठी दिलेली मूक आर्तहाक मनुष्यांपर्यंत पोहोचणे खरे गरजेचे आहे.

मानव भौतिक सुखांच्या मागे लागला आहे. जगणे अँड्रॉइड झाले आहे. सिमेंटचे जंगल वेगाने फोफावत आहे. मात्र, यामुळे निसर्गाचे संतुलन वेगाने ढासळतेय. पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने हवामानाचे तंत्रही बिघडले आहे. पशुपक्षी नामशेष होत आहेत. निसर्गाचे संतुलन तोलण्याची मोठी जबाबदारी पार पाडणारे पशुपक्षी जगण्यासाठी धडपडत आहे. निसर्गाचे हे धन खरेच जपायचे असेल तर पशुपक्ष्यांसाठी दाणा - पाण्याची सोय समाजातील प्रत्येक घटकाने आवर्जून करायला हवे असे आवाहन युवा पत्रकार कुमार अमोल कुमरे यांनी केले आहे.