सह्याद्री चौफेर | रवी घुमे
मारेगाव : संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले असून जगातील जवळपास 194 देशांनी मिळून त्यास मान्यता देऊन पूर्ण जगभरात पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर देश पातळीपासून ते गाव पातळी पर्यंत सर्व स्तरांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी श्री.सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक श्री सचिन आत्राम यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 रोजी गोधनी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचा सहभाग घेऊन गावात पौष्टिक तृणधान्याचे आहारातील प्रमाण वाढावे या करिता शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व सांगणार्या विविध घोषणा देऊन प्रभात फेरी काढण्यात आली.
प्रभात फेरी मध्ये पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व सांगणारे माहितीपत्रके वाटप करण्यात आले. पौष्टिक तृणधान्याचे आहारातील प्रमाण वाढविणे, पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढविणे व पौष्टिक तृणधान्याची आरोग्य विषयक महत्त्व बाबत जनमानसात जनजागृती करणे, तृणधान्यावर प्रक्रिया करून प्रक्रिया उद्योगांना अर्थसहाय्यासह विविध उपपदार्थ तयार करणे व त्यांचा आहारात समावेश वाढविणे असे उद्देश समोर ठेवण्यात आलेले आहेत.
कार्यक्रमात कृषी सहाय्यक सचिन आत्राम , मनोहर पेठे मुख्याध्यापक जि. प.शाळा गोधणी यांनी पौष्टिक तृणधान्याचे मानवी आहारातील मूल्य व त्याचे आहारातील महत्त्व या विषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली तसेच लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत आरोग्याच्या समस्या, स्थूलता, बद्धकोष्ठता, मधुमेह महिला व लहान मुलांमध्ये अनेमिया यासारख्या आजारांवर मात करण्यासाठी ज्वारी आणि बाजरीचे नियमित सेवन करण्याचे प्रतिपादन केले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त आहारामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा यासारख्या पौष्टीक तृणधान्यांचा समावेश वाढविणे त्याचबरोबर सदरील पौष्टिक तृणधान्यांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ, बेकरीचे पदार्थ तयार करणे शक्य असून त्यांचा आहारात वापर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्याचबरोबर केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म उन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत 35 टक्के व जास्तीत जास्त 10 लक्ष रुपयांपर्यंत प्रक्रियेसाठी अनुदान उपलब्ध असून जास्तीत जास्त शेतकर्यांनी, युवकांनी, बचत गटाच्या महिलांनी लाभ घेवून प्रक्रिया उद्योग उभे करावेत असे सदर प्रसंगी बोलताना आवाहन केले.
याप्रसंगी उपस्थित शेतकर्यांनी शेत तिथे तृणधान्ये व मिलेट ऑफ द मंथ या संकल्पना शेतकर्यांपर्यंत रुजवून आत्मसात करणे बाबतचे मत व्यक्त केले. या प्रसंगी गावातील सरपंच सौ.मंदा मंडाळी, उपसरपंच श्री धनंजय गवळी, पोलिस पाटील सौ.मीना गवळी, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, ग्राम पंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका महिला शेतकरी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
कृषी विभागाच्या वतीने गोधणी येथे तृणधान्य वर्ष साजरे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 27, 2023
Rating:
