नदीच्या पात्रात उडी घेतल्याने ४ शेतकरी वाघाच्या तावडीतून बचावले

                               (संग्रहीत फोटो)

सह्याद्री चौफेर | न्यूज 
9011152179

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील पाटाळा येथील मारुती ढगडी हे पशुधन चारण्यासाठी वर्धा नदीच्या रेल्वे पुलालगत शिवमंदिराजवळील शेतात गेले होते. नदीच्या दुसऱ्या तिरावरील कोना गावातील इतर तीन शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बैलांना चारण्यासाठी आणले होते. चौघे ही एकाच झाडाखाली सावलीत बसले असता, दरम्यान झूडपात दबा धरून बसलेला पट्टेदार वाघ बाहेर आला आणि कोना येथील शेतकरी गणेश खामणकर यांच्या बैला वर हल्ला केला, वाघाने बैलाच्या पायाला नखानी ओरबडले. यात बैल जखमी झाला. वाघ एकदम समोर दिसताच या चारही जणांना प्रचंड धसकी भरली व वाघाच्या रूपात साक्षात मृत्यूच समोर आल्याने या चारही शेतकऱ्यांनी सैरावैरा पळत जवळच असलेल्या नदी पात्रातील पाण्यात उडी घेत नदीच्या पलीकडे कोना गावाच्या हद्दीत जावून जीव वाचवला. दरम्यान,त्यांनी आरडा ओरड करून गावाकऱ्यांना बोलावले, वाघ शेतशिवारात असल्याची माहिती कळताच वाघाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.10 ते 15 युवकांनी आरडा ओरड करून वाघाच्या दिशेने कूच केली परंतु तोपर्यंत वाघ तेथून निघून गेला होता. घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. काही दिवसापूर्वी माजरीतील एका युवकाला घरासमोरून उचलून नेत वाघाने ठार केले. त्यामुळे चंद्रपूर यवतमाळ सीमावर्ती भागात वाघाची प्रचंड दहशत पसरली असतांना वर्धा नदीच्या काठावर भुरकी रांगना परिसरात वाघाने आणखीन एका युवा शेतकऱ्याला ठार केल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली. सलग या परिसरात वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिक चांगलेच भयभीत झाले आहे. शेतीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात गेल्याशिवाय पर्याय नाही. शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरी गाई म्हशी पाळतात. मात्र, वाघाच्या भीतीने शेती कशी करायची, गुरे कशी पाळायची असा प्रश्न उभा ठाकला आहे. दरम्यान, वाघाच्या दहशतीने चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी भयभीत झाले असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. 
नदीच्या पात्रात उडी घेतल्याने ४ शेतकरी वाघाच्या तावडीतून बचावले नदीच्या पात्रात उडी घेतल्याने ४ शेतकरी वाघाच्या तावडीतून बचावले Reviewed by सह्याद्री चौफेर on November 14, 2022 Rating: 5
Powered by Blogger.