इंग्लंड ठरला टी-२० विश्वचषक २०२२ चा विजेता, पाकिस्तानवर ५ विकेट्सने दणदणीत विजय

 
सह्याद्री चौफेर | न्यूज 
 
वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी २० विश्वचषकाचा आज समारोप झाला. टी२० विश्वचषकाचा अंतिम फेरीतील सामना रविवारी (१३ नोव्हेंबर) रोजी ऐतिहासिक मेलबर्न मधील एमसीजी म्हणजेच मेलबर्न क्रिकेट मैदानवर संपन्न झाला. 
 टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात आज मेलबर्न येथे खेळवला गेला त्यात इंग्लंडने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभव करत टी२० विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले. बेन स्टोक्सने झुंजार अर्धशतकी खेळी करत संघाला विश्वचषक जिंकून दिला. मात्र मोक्याच्या क्षणी तीन गडी बाद करणाऱ्या सॅम करनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
प्रथम फलंदाजीसाठी पाकिस्तानला इंग्लंडने आमंत्रित केले. पाकिस्तानसाठी बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी २९ धावांची सलामी दिली. रिझवान या सामन्यात केवळ १५ धावा करून बाद झाला. युवा मोहम्मद हॅरिस या सामन्यात अपयशी ठरला. कर्णधार बाबरने २८ चेंडूवर ३२ धावांची संथ खेळी केली. शान मसूदने ३८ तर शादाब खानने २० धावांचे योगदान दिले.
 इंग्लंडच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत एकही पाकिस्तानी फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. सॅम करनने टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजीला खेळपट्टीवर तग धरू दिले नाही. त्याने ४ षटकात फक्त १२ धावा देत पाकिस्तानचे ३ फलंदाज बाद केले. याचबरोबर आदिल राशिदने बाबर आझम हा इंग्लंडसमोरील मोठा अडसर दूर केला. त्याने २२ धावा देत दोन गडी बाद केले. ख्रिस जॉर्डननेही २ बळी घेत इंग्लंड संघाला मदत केली. यामुळे पाकिस्तानला २० षटकात ८ बाद १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक ३८ धावा केल्या. तर कर्णधार बाबर आझमने ३२ धावा केल्या.


इंग्लंड ठरला टी-२० विश्वचषक २०२२ चा विजेता, पाकिस्तानवर ५ विकेट्सने दणदणीत विजय इंग्लंड ठरला टी-२० विश्वचषक २०२२ चा विजेता, पाकिस्तानवर ५ विकेट्सने दणदणीत विजय Reviewed by सह्याद्री चौफेर on November 13, 2022 Rating: 5
Powered by Blogger.