विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : मारेगाव तालुक्याचा एक मात्र मुख्य व्यवसाय शेती असून शेतीवरच उदरनिर्वाह चालतो. कोरडवाहू शेती असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पावसावर अवलंबून राहावे लागते आणि यंदा पावसाने कहरच केला, खूप अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतातील उभे पीकांचे अतोनात नुकसान झाल्याने नुकसान भरपाई निधी देण्याचे जाहीर केले. त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी,अशी मागणी निवेदनातून मारेगाव तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
मारेगाव तालुक्याला निधी प्राप्त झाला आहे. निधी वाटपाचा आदेशही देण्यात आला मात्र, तो निधी अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाला नाही. अतिवृष्टीचा तहसील कार्यालयाला प्राप्त झालेला निधी दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा करावा, अशी मागणी नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, रवी पोटे, धिरज डांगाले, दिनकर पावडे, अतुल वटे माजी सरपंच, अंकुश माफूर, गायधन यांचे सह असंख्य शेतकऱ्यांनी केली आहे.
कार्यालयाला प्राप्त निधी वाटपाचे आदेश दिले, तरी देखील शेतकरी तहसील कार्यालयात सतत हेलपाटे मारतच आहे. कर्मचाऱ्याकडून अजून पर्यंत शासनाने सोपविलेली जबाबदारी पार पडली नसल्यामुळे शेतकरी या निधी पासून वंचित आहे तसेच दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांचा दसरा हा सण अंधारात गेला असून दिवाळी हा सण सुद्धा अंधारात जाण्याची शक्यता आहे. मा.जिल्हाधिकारी यांनी निधीचा वाटप न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना दिली असतांना त्या सूचनेला तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखविली आहे. अशी तक्रार निवेदनातून शेतकऱ्यानी केली.
आज घडीला जगाचा पोशिंदा आर्थिक संकटात असून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपावल्या आहे. तहसील कार्यालयाला प्राप्त निधी वाटपाचे आदेश दिले त्यामुळे निधी वाटपाचे कार्य तातडीने चालू करावे, अन्यथा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसू अशा, इशारा दिलेल्या निवेदनातून दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांनी दिला.