कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व इतर कार्यालय प्रमुखांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.
केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने “हर घर झेंडा” या उपक्रमाच्या आयोजनाबाबत विविध निर्देश दिलेले आहेत. यानुसार संपूर्ण जिल्हाभर प्रत्येक नागरिकांचा सहभाग घेऊन अधिकाधिक लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्याचा मनोदय जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्राधान्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर व नागरिकांनी स्वत:च्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालय, परिवहन, आरोग्य केंद्र, रास्तभाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांचा यात महत्वाचा सहभाग राहील.
भारतीय ध्वज संहिता 2002 भाग 1 मधील परिच्छद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर / सूत / सिल्क / खादी कापडापासून बनविलेला असेल, असे नमूद केले होते. या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला असून सदर बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत / पॉलिस्टर / लोकर / सिल्क / खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत, असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतुदीनुसार आता तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल, असे केंद्रीय गृह विभाग यांच्या दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
हा अभिनव उपक्रम संपूर्ण जिल्हाभर यशस्वी व्हावा व प्रत्येक इच्छूक नागरिकांचा सहभाग यात नोंदविला जावा यादृष्टिने लवकरच स्वतंत्र ॲप विकसित करून त्यात प्रत्येकाला आपले नाव नोंदविता येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. याचबरोबर या उपक्रमात भाग घेणाऱ्या प्रत्येकांना याचे छायाचित्रण, चित्रफित, ध्वनीमुद्रण आदी केंद्र शासनाच्या संस्कृति मंत्रालयाच्या amritmahotsav.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करता येईल.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि प्रत्येक ग्रामपंचायती यांचा महत्वपूर्ण सहभाग राहील. यासाठी ग्रामपंचायतीबाबत कृती आराखडा, जिल्ह्यातील सर्व आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपविभागीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, रास्तभाव दुकान, शाळा-महाविद्यालय, पोलीस, परिवहन सुविधा, मनपा, नगरपरिषद, नगरपंचायत या सर्व विभागाशी सुवर्णमध्य साधून अधिक लोकसहभागावर भर देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी या बैठकीत दिले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त ११ ते १७ ऑगस्ट पर्यंत “हर घर झेंडा” सप्ताह – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 27, 2022
Rating:
