चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : तालुक्यातील विविध ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे कमी प्रमाणात तसेच अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिक विशेषतः महिला कमालीच्या त्रस्त झाल्या आहेत. त्यातच अघोषित भारनियमनामुळे देखील पाणीपुरवठ्याच्या पाण्याच्या टाक्या वेळेत भरत नसल्याने याचा परिणाम होत आहे.
दारव्हा तालुक्यात बहुतांश गावामध्ये नळ योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.परंतु दैनंदिन वापरातील पाणी साठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी पुरवठा करण्याबाबत योग्य नियोजन नसल्याने नळांना कमी प्रमाणात पाणी येते. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यातच सध्या जल जीवन मिशन अंतर्गत नव्याने नळजोडणी चे काम पंचायत समिती स्तरावर युद्धपातळीवर करण्यात येत असून जुन्या पाईपलाईन खोदकाम केल्यामुळे नळ योजना विस्कळीत झाली आहे, परिणामी अनेकांना विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी पिल्लू पंपाचा वापर करून जास्त पाणी साठा केला जातो. टिल्लू पंप वापरणाऱ्यांना कुठलीच कारवाई ग्रामपंचायत व शासनाकडून होत नसल्याने अनेक ग्रामस्थ खुलेआम नळाला टिल्लू पंप लावून पाणी ओढून घेत आहे.
प्रशासनाने या टिल्लू पंप वापरणाऱ्या विरोधात कारवाई करावी, तसेच पंचायत समिती प्रशासनाने जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नव्याने नळजोडणी च्या कामांना गती मिळावी याकरिता संबंधित कंत्राटदार अथवा अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी तालुक्यातील विविध गावातील नागरिकांची मागणी आहे.
अनियमित पाणी पुरवठ्याने ग्रामीण नागरिक त्रस्त..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 05, 2022
Rating:
