सह्याद्री : चौफेर न्यूज
नाशिक : युवा साहित्य मंच, महाराष्ट्र आणि नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने खुले कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.
जगात जगण्यासाठी मिञा साथ असावी
मजेत जगण्यासाठी मिञा साथ असावी.
कोण कुणाचे नाही मिञा येथे परके सारे
दोन घरांच्या भिंती मधूनी साद असावी
असेच राहू दुनियेमध्ये मित्र बनुनी मिञा
जगण्यासाठी वाट ही आपली एक असावी..
तुझे नी माझे नाते जुळले पुन्हा एकदा
सुदाम आणि कृष्णा सारखी मैत्री असावी...
निस्वार्थी मैत्री विषयी अपेक्षा व्यक्त करीत कवी बाळासाहेब गिरी यांनी साद घातली .
विरहात पोळते ती,स्वप्नांतही ती छळते
श्वासांत धुंद होणे, केवळ तिलाच कळते !
अशी प्रेम कविता कवी पंकजकुमार गवळी यांनी गात कवी संमेलनात रंग भरले तर
हिर्वी बोली माझे मला कळेना
सुचतात कशा ह्या ओळी ?
का बोलते हे रान
माझ्याशी हिर्वी बोली
असे म्हणत संमेलन अध्यक्ष जेष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांनी ग्रामीण जीवनाची सुंदरता निसर्ग कवितेतून सादर करीत रसिकांची भरभरून दाद मिळवली.
भुजबळ फार्म येथील जेष्ठ नागरिक हॉलच्या सभागृहात रंगलेल्या काव्य मैफिलीत व्यासपीठावर पुंजाजी मालुंजकर, अजय बिरारी, प्रवीण जोंधळे, रविकांत शार्दुल,ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाने, सुभाष सबनीस, युवा साहित्य मंचाचे अध्यक्ष किरण सोनार, संजय गोरडे, संजय गोराडे, माणिकराव गोडसे, सावळीराम तिदमे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाने यांनी केले. कवी संमेलनात नाशिक आणि नाशिक बाहेरून आलेल्या ४० हून अधिक कवींनी आपली कविता सादर करत ही काव्य मैफिल रंगवली. यावेळी कवी देवदत्त चौधरी यांनी "बाबा मालं साळा शिकून, मोठी होऊ दे रं!" ही सामाजिक कविता सादर केली तर राज शेळके यांनी "चाल पुढेच सारखा कर उद्याचा विचार, अपयशाच्या ढगाला असे यशाची किनार" असे म्हणत युवा वर्गाला प्रेरणा दिली . सर्वेश साबळेने विठ्ठल भक्तीची कविता सादर करीत वातावरण भक्तिमय केले. तसेच उपस्थित सारस्वतांमध्ये शुभांगी पाटील , भारती देव, रवींद्र दळवी, किरण मेतकर, विनायक पाटील, साहेबराव पाटील, योगिता जाधव, मंदाकिनी हांडे, सत्यजित पाटील, अनिल देवरे, गोकुळ वाडेकर, नंदकुमार ठोबरे, वृषाली साटम, विलास गोडसे, डॉ अंजना भंडारी, गोविंद दराडे, राजू रसाळ, पलाश तांदळे, शुभम मोरे, संदीप पगारे, रणजित तिडके यांनी व्यवस्थेवर, समाजावर ओरखेडे ओढणारी शब्द रचना सादर केली.
शेवटी आभार प्रदर्शन यु. सा. मं. उपाध्यक्ष रमेश वाघ यांनी केले. सूत्रसंचालन यु. सा. मं. कार्याध्यक्ष विशाल टर्ले, सरचिटणीस वर्षा शिदोरे, चिटणीस अश्विनी भालेराव यांनी केले. यावेळी युवा साहित्य मंच, महाराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष किरण सोनार यांनी सर्व उपस्थित प्रमुख मान्यवरांची उपस्थिती युवा मंचास कशा प्रकारे उंचीवर घेऊन जाणारी ठरेल याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व साहित्यिक मान्यवर आणि काव्य रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज गवळी, पलाश तांदळे, सर्वेश साबळे, राजू रसाळ, नवे नाशिक जेष्ठ नागरिक मंडळ पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.
मैत्री आणि प्रेम कवितांनी रंगली युवा साहित्य मंचची काव्य मैफिल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 18, 2022
Rating:
