टॉप बातम्या

जोपर्यंत ईच्छा आकांक्षा असेल तोपर्यंत सुख दुःख कधीही संपणार नाही: अंध बाल कलाकार "चेतन"


सह्याद्री | चौफेर न्यूज 
          
मारेगाव : स्वतःच्याच हाताने स्वतःचा मृत्यु ओढवुन घेणे अर्थात आत्महत्या करणे ही कृती चुकीची असल्याचे मनोगत (ता.२०) एप्रिल रोजी नगरपंचायत मारेगावच्या प्रांगणात झालेल्या चेतन सेवाकुंर प्रस्तुत "मैफिल स्वरांची" ह्या संगीतमय कार्यक्रमातील मुख्य वादक अंध बाल कलाकार "चेतन" ह्याने व्यक्त केले. जीवनाशी संघर्ष करणाऱ्या या अंध बाल कलावंतानी सादर केलेल्या हिंदी मराठी गीतांनी मारेगावकरांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले होते.
        
दरम्यान या कार्यक्रमाचे उद्घाटन ठाणेदार राजेश पुरी, राकेश खुराणा, ॲड.सूरज महाडोळे, याचे हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नेते गजानन किन्हेकर,माजी जि. प.सदस्य अनिल देरकर, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर व एस.बि.ट्रेडर्स चे संचालक गौरीशंकर खुराणा तसेच कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मामचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.
            
मारेगाव तालुक्यात सातत्याने होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा विषय असुन मागील दोन वर्षात शतकी आकडा पार झाला आहे. हाच धागा जोडत अंध बाल कलाकार चेतन पुढे म्हणाला, आम्ही अंध असुन सुध्दा सकारात्मक (positive) विचार करुन आनंदी जीवन जगतो. जोपर्यंत ईच्छा आकांक्षा असेल तोपर्यंत सुख दुःख कधीही संपणार नाही. यासाठी कर्तव्यनिष्ठ राहुन हिम्मत, परिश्रम उद्योग करण्यात पुरुषार्थ असुन आपले जिवन तेजोमय करण्यासाठी सकारात्मक विचारसरणी असेल तर आत्महत्या होणार नाही. असे मनोगत व्यक्त करुन गीतांच्या संगीतमय कार्यक्रमातून नातेसंबंध व समाज प्रबोधनाचे दर्शन घडवत मारेगावकर तथा परिसरातील बांधवांना मंत्रमुग्ध केले. 

Previous Post Next Post