नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर
महागाव : कार्ल मार्क्सनंतर जर कोणी अभ्यास करण्याचा विक्रम मोडला असेल तर ते भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर. डॉ आंबेडकर यांच्या विचारांची अजूनही गरज आहे. त्या करिता सुज्ञ आणि तरुण पिढीने समोर आले पाहिजे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांनी केले.
महागांव, फुलसावंगी, ढाणकी, बिटरगाव आणि उमरखेड येथील शांतता समिती ते बोलत होते. त्यांनी विविध ठिकाणी शांतता समितीच्या माध्यमातून जनतेसोबत विविध विषयावर संवाद साधला. भारतीय घटनेतील प्रस्तावना जरी आपण वाचली, तरी विविधतेने नटलेला भारत व आदर्श समाज निर्मिती आपल्या डोळ्यापुढे उभी राहते, असे त्यांनी सांगितले.
उमरखेड तालुक्यातील खरूस येथील भीम जयंती होणारा खर्च टाळून समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक बाबीवर तो खर्च केला जाणार असल्याचे समजबांधवानी सांगितले. अनेक गावच्या पोलीस पाटलांचा सत्कार करण्यात आला. उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या सर्व पोलीस ठाण्यात डॉ. भुजबळ पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, ठाणेदार विलास चव्हाण, ठाणेदार अमोल माळवी, प्रदीप घोष, सचिन खेडकर आदी उपस्थित होते.
"चांगला माणूस बनण्यासाठी प्रयत्न करावा"
प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून चांगला माणूस बनण्यासाठी प्रयत्न केला तर आपोआपच शेजारीसुद्धा तुमचे अनुकरण केल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास डॉ दिलीप भुजबळ यांनी व्यक्त केला. अनावश्यक वाद्य, डीजे यांचा वापर न करता कोणत्याही समाजातील उपेक्षित घटकांना मूळ प्रवाहात आणण्याकरिता सामूहिक प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बाबासाहेबांच्या विचारांची समाजाला गरज - पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांचे आवाहन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 11, 2022
Rating:
