सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कास्तकारांच्या धान्याची व्यापाऱ्यांमार्फत खरेदी केली जाते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवानाधारक व्यापारी धान्याची बोली लावून कास्तकारांकडून धान्य खरेदी करतात. बाजार समितीच्या माध्यमातून खरेदी विक्रीचा हा व्यवहार चालतो. ५ जानेवारी २०२२ ते ११ जानेवारी २०२२ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कास्तकारांनी विक्रीकरिता आणलेले धान्य बाजार समितीचा परवानाधारक व्यापारी धीरज अमरचंद सुराणा रा. बन्सल ले-आऊट, दत्त मंदिर याने खरेदी केले. या व्यापाऱ्याची रुपेश नवरतनमल कोचर रा. पद्मावती नगर याने हमी घेतली होती. कास्तकारांचे धान्य घेतल्यानंतर व्यापारी व जमानतदार दोघेही धान्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. धान्य खरेदी केल्यानंतर २४ तासांच्या आत धान्याच्या चुकाऱ्याची रक्कम कास्तकाराच्या खात्यात जमा होणे अनिवार्य असते. पण महिना लोटूनही कास्तकारांना अद्याप धान्याचे चुकारे मिळाले नाही. व्यापाऱ्यांना वारंवार नोटिसा बजावूनही ते धान्याची रक्कम अदा करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. त्यामुळे कास्तकार व बाजार समितीची त्यांनी फसवणूक केल्याचे दिसून येते. या व्यापाऱ्यांनी १४७ कास्तकारांकडून जवळपास १९३५.०२ क्विंटल धान्य (चना, तूर, सोयाबीन) खरेदी केले असून त्या धान्याचे बाजार मूल्य १ कोटी १३ लाख ७८ हजार १३१ रुपये एवढे आहे. बाजार समितीचे सेवा शुल्क देखिल या व्यापाऱ्यांनी भरले नसून ८५ हजार ३३५ रुपये या व्यापाऱ्यांकडे थकीत आहे. कास्तकार व बाजार समितीचे मिळून १ कोटी १५ लाख २६ हजार ४६ रुपये या व्यापाऱ्यांकडे थकीत असून पैसे देण्याची त्यांची नियत नसल्याने ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यांना गुन्हे दाखल झाल्याचे कळताच त्यांनी अटकपूर्व जामिनीसाठीही प्रयत्न केल्याचे समजते. धीरज अमरचंद सुराणा हा बाजार समितीचा परवानाधारक व्यापारी असून त्याचा परवाना नंबर ०७ हा आहे. या जेम्सबॉन्ड ने कोट्यवधी रुपयांचे धान्य हडप केले आहे. मागील दोन वर्षांपासून संकटांचा सामना करणाऱ्या कास्तकारांच्या तोंडचा घास या व्यापाऱ्यांनी पळवला असून त्यांना आर्थिक संकटात टाकले आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या कास्तकाराच्या पोटावर मारून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या या लबाडांवर बाजार समितीचे सचिव अशोक काशीनाथ झाडे (५२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि च्या कलम ४०६,४२०,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस त्यांचा शोध घेत असून लवकरच त्यांना गजाआड करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोउपनि शिवाजी टिपूर्णे करीत आहे.
धान्याचे चुकारे थकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 02, 2022
Rating:
