मंत्री दानवेंनी जाहीर माफी मागावी:नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


सह्याद्री चौफेर | न्यूज 

यवतमाळ : सलून व्यावसायिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी, या मागणीसाठी १४ मार्च रोजी जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना दानवे यांनी सलून व्यावसायिकांचा संदर्भ देत आक्षेपार्ह व बेजबाबदार वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. सतत प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी दर वर्षी कुणाबद्दलही किंवा जातीबद्दल आक्षेपार्ह विधाने करण्यात दानवे माहीर असून, त्यांच्यावर कारवाई व्हावी. मंत्री दानवे समाजाची माफी मागत नाहीत, तोपर्यंत नाभिक समाज शांत बसणार नसून आंदोलन छेडू, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी या वेळी दिला. आमच्या समाजाबद्दल अशी विधाने करणाऱ्यांना कायमस्वरूपी वचक बसावा, संबंधितावर कारवाई होईल यादृष्टीने कायदा व्हावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नक्षणे, संतोष मोतेवार, शेखर वानखडे, प्रभाकर घेणेकर, पुमंडलिक कुबडे, महेश हरसुलकर, विनोद धाबेकर, स्वप्नील वाटकर, निलकांत तायडे, नागेश्वर निंबाळकर, दिलीप मादेशवार, अशोक झोडगे, महेश गंगोत्री आदी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
मंत्री दानवेंनी जाहीर माफी मागावी:नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मंत्री दानवेंनी जाहीर माफी मागावी:नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on March 15, 2022 Rating: 5
Powered by Blogger.