सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी : आदीवासीबहुल तालुक्यातील अहेरअल्ली या गावातील शेतकरी तब्बल २१ वर्षांपासून धरणाच्या पाण्यासाठी तरसले आहेत. सतपल्ली पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरी (पोड) धरणातून या लोकांना पाणी तर मिळालेच नाही, पण त्यांच्या जमिनी सुध्दा वाया गेल्या आहेत. अहेरअल्ली येथील शेतकरी म्हणतात जमीन पूर्ववत करून देण्यात याव्यात.
‘सरकारी काम अन् एक वर्ष थांब’ असं शासकीय कार्यालयांच्या बाबतीत नेहमीच बोललं जातं. परंतु एक वर्ष नाही तर २१ वर्षांपूर्वी येथे लघु पाटबंधारे विभाग पांढरकवडा व्दारे सतपल्ली जवळील उमरी येथे धरण बांधण्यात आले. उजवा आणि डावा, असे दोन कालवे तयार करण्यात आले. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्या. शेतांमध्ये खोदकाम करून कालवे काढण्यात आले. पण तेव्हापासून आजता गायत एक थेंबही पाणी अहेरअल्लीतील शेतकऱ्यांना मिळालेले नाही. कालवे मात्र प्रत्येकाच्या शेतात खोदून ठेवलेले आहेत. त्यामुळे गेल्या २१ वर्षांपासून तेथे पीक घेता येत नाही. आधी आमचे वडील आणि आता आम्ही दरवर्षी नुकसान सोसतोय.
शेत पूर्ववत करून द्या!
आम्ही स्वतः कालव्यात गेलेली जमीन पूर्ववत करतो म्हटलं, तर लाख रुपयांच्यावर खर्च लागेल आणि हा खर्च करण्याच्या परिस्थितीत आम्ही नाही. गेल्या २१ वर्षांत धरणाचे पाणी मिळू शकले नाही, ते आता मिळण्याची शक्यताही पूर्णतः मावळली आहे. त्यामुळे मायबाप सरकारला विनंती आहे की, नका देऊ पाणी, पण आमचे शेत पूर्ववत करून द्या. धरणात लिकेज झाल्यामुळे तेथे पाणी शोधूनही सापडत नाही. त्यामुळे जे धरणातच नाही ते आमच्या शेतात कसे येणार, असा प्रश्न वैभव राऊत, रिवास भोयर, रोहित राऊत या शेतकऱ्यांनी केला आहे.
मत्स्य उत्पादनही नाही
धरणात पाणी तर नाही, पण जमिनीही गेल्या. धरणात मत्स्य उत्पादनाचेही नियोजन केले गेले होते. मच्छीमार संस्थेने तशी तयारीही केली. पण धरणात पाणीच टिकत नसल्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाले. धरणासाठी जमिनी घेतल्या तेव्हा परिसर सुजलाम सुफलाम होईल, असे चित्र रंगवण्यात आले होते. पण काहीच झाले नाही. मग या प्रकल्पातून साध्य काय झाले तर, संबंधितांनी थातूरमातूर प्रकल्प उभारला आणि आपले उखळ पांढरे करून घेतले. आज या प्रकल्पावर एक कर्मचारीसुद्धा नाही, असे हितेश राऊत म्हणाले.
२१ वर्षांत शेतकऱ्यांना थेंबभरही पाणी मिळाले नाही; शेतकरी म्हणतात, जमीन पूर्ववत करून द्या!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 01, 2022
Rating:
