आयजीच्या दौऱ्यानंतरही अशीच शिस्त कायम राहील काय, शहरातील अनियंत्रित वाहतुकीला नियम लागतील काय !

प्रशांत चंदनखेडे | सह्याद्री चौफेर 

वणी : दुचाकी व चार चाकी वाहनांनी नेहमी वेढुन राहणाऱ्या रस्त्याने आज मोकळा श्वास घेतल्याचे पाहायला मिळाले. पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय व न्यायालयाकडे जाणारा हा रस्ता आज अगदीच खुला वाटत होता. नेहमी रस्त्याला घेरून राहणारी वाहने रस्त्यापासून दूर अगदीच शिस्तीत लावली जात होती. मार्गक्रमण करतांना आज जराही अडथळे निर्माण न झाल्याने नागरिकांनाही कौतुकास्पद वाटत होतं. दुचाकी व चार चाकी वाहनांचा रस्त्याच्या भोवती असणारा गराडा आज मात्र दिसून आला नाही. कार्यालयीन कामाकरिता येणाऱ्या नागरिकांना त्यांची वाहने अगदीच शिस्तीत लावण्याची ताकीद देण्यात येत होती. एरव्ही शासकीय वाहनांना अडथळे निर्माण होत असतांनाही कधी कार्यालयीन परिसरात वाहने उभी करतांना शिस्त लावण्यात आली नाही, ती शिस्त आज कटाक्षाने पाहायला मिळाली. कारण होते अमरावतीचे पोलिस उप महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना यांच्या वार्षिक निरीक्षण दौऱ्याचे. आयजींचा आज निरीक्षण दौरा असल्याने पोलिसांनी आज चांगलीच खबरदारी घेतली. रस्त्यावर नियमबाह्य पद्धतीने वाहने उभी राहणार नाही याची दक्षता घेतली. पोलिसांमध्येही आज शिस्त दिसून येत होती. कामात शिस्तबद्धता दिसावी याचा पोलिसांनी पुरेपूर प्रयत्न केला. पण ही शिस्त आयजीच्या दौऱ्यापूर्तीच राहील की कायमस्वरूपी, या चर्चेला आज शहरात उधाण आले होते. 

मागील काही महिन्यांपासून वाहतूक विभागाने शहरातील वाहतुकीच्या समस्येकडे पुरते दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात वाहतुकीचा कोंडवाडा झाला आहे. वाहतुकीची समस्या खूपच बिकट झाली आहे. शहरातील वाहतुकीने अगदीच बकाल रूप धारण केलं आहे. अनियंत्रित वाहतुकीवर पोलिसांचं नियंत्रणच उरलेलं नाही. अनियंत्रित वाहतुकीमुळे नागरिकांचं रस्त्यांनी मार्गक्रमण करणं कठीण झालं आहे. वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून शहरात वाहतूक सुरु आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर नेहमी जाम लागताना दिसतो. शहरातून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरु आहे. पोलिसांच्या डोळ्यादेखत जड वाहने शहरातून जाणे येणे करतात. ट्रक व ट्रेलर सारखी मोठी वाहनेही शहरातून जातांना दिसतात. टोल नाका वाहचविण्याकरिता टिळक चौक ते इंदिरा चौक मार्गे ब्राह्मणी फाटा हा जड वाहनांचा नेहमीचा मार्ग झाला आहे. टिळक चौक ते टागोर चौक मार्गे दिपक चौपाटी ते लालगुडा चौपाटी हा मार्ग वाहतुकीने नेहमी गजबजलेला असतो. खाती चौक ते गांधी चौक मार्गावर नेहमी वाहतुकीचा जाम लागताना दिसतो. रस्त्यांवर नियमबाह्य पद्धतीने उभ्या असलेल्या वाहनांमुळे रहदारीला अडथळे निर्माण होण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी होतांना दिसते. रस्त्याच्या कडेला थाटलेली दुकाने, हातगाड्या, साहित्य ठेवण्याकरिता रस्त्यापर्यंत वाढवलेली दुकाने यामुळे रस्ते अरुंद झाल्याने नेहमी वाहतुकीची कोंडी होतांना दिसते. शहरातील काही रस्ते तर वाहने उभी करण्याचे मैदान बनले आहे. हा रास्ता आहे की, वाहने पार्किंग करण्याची जागा हेच कळत नाही. टिळक चौकाव्यतेरिक्त अन्य चौकात वाहतूक पोलिसांची उपस्थितीच दिसत नाही. अंतर्गत रस्त्यांवरून सुसाट वाहने चालवली जातात. दुचाकींवर ट्रिपल सिट बसणं आता नित्याचाच झालं आहे. दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीकडेही सपशेल दुर्लक्ष केलं जात आहे. वाहतूक पोलिस फक्त शहराबाहेरील वाहतूक नियंत्रित करण्यावर भर देत आहे. ब्राह्मणी फाटा, लालगुडा चौपाटी, वरोरा टी-पॉईंट, चारगाव रोड, संविधान चौक, वरोरा रोड, मुकुटबन घोन्सा टी-पॉईंट, मुकुटबन रोड ही वाहतूक पोलिसांची वाहने चलान करण्याची नेहमीची ठिकाणे झाली आहेत.शहरातील वाहतुकीच्या समस्येकडे मात्र वाहतूक पोलिसांनी कायम दुर्लक्ष केलं आहे. मागील काही महिन्यात तर वाहतुकीला कुठलीच शिस्त उरली नसल्याचे पाहायला मिळत आहे. ऑटो धारकांनी तर रोडचा मालकीहक्क मिळविल्यागत रोडचा ताबा घेतला आहे. रस्त्यांवर मानमर्जीने कुठेही ऑटो उभे केले जातात. प्रवासी वाहतूक करणारी खाजगी वाहनेही रस्ता वेढुन तासंतास उभी असतात. पेट्रोल पंपांवर नेहमी ट्रकच्या रांगा लागलेल्या असतात. डिजल भरण्याकरिता रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी वाहने लावली जातात. डिजल भरण्याकरिता रांग लावून उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे तर कित्येक छोटे मोठे अपघात झाले आहेत. शहरात छोटे मोठे अपघात तर आता नित्याचेच झाले आहेत. नियमांची पायमल्ली करून शहरात वाहतूक सुरु आहे. वाहनधारकांचे वेगावर नियंत्रण राहिले नाही. तरुण मंडळी स्टंटबाजी करत शहरातून सुसाट वाहने चालवितात. वाहतुकीच्या समस्येने बकाल रूप धारण केले असतांनाही वाहतूक पोलिसांचा कर्तव्यदक्षपणा दिसून येत नाही, याचेच नवल वाटते. शहराबाहेरील वाहतूक नियंत्रणाकडेच त्यांची कर्तव्यनिष्ठा असल्याचे पाहायला मिळते. आयजीच्या दौऱ्यानिमित्ताने जी शिस्तबद्धता पाहायला मिळाली, ती शिस्त कायमस्वरूपी शहरातील वाहतुकीला लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
आयजीच्या दौऱ्यानंतरही अशीच शिस्त कायम राहील काय, शहरातील अनियंत्रित वाहतुकीला नियम लागतील काय ! आयजीच्या दौऱ्यानंतरही अशीच शिस्त कायम राहील काय, शहरातील अनियंत्रित वाहतुकीला नियम लागतील काय ! Reviewed by सह्याद्री चौफेर on March 22, 2022 Rating: 5
Powered by Blogger.