सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : शहरात कुठेही मटका खेळला जाणार नाही, याची पोलिसांकडून पूर्णतः खबरदारी घेतली जात असतांनाही काही मटका बहाद्दर शहरापासून दूर निर्जनस्थळी लपून छपून मटका चालवत असल्याने पोलिसही हैराण झाले आहेत. अशाच एका शहरापासून दूर लपून छपून मटका चालवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी काल सायंकाळी ४.४० वाजताच्या सुमारास लालगुडा चौपाटी परिसरातून अटक केली आहे. बसस्टँड मागे मटका चालवणाऱ्या या आरोपीला मटका पट्टी फाडतांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. अवैध धंद्यांवर कडक निर्बंध लावण्यात आले असतांना, व पोलिस अवैध धंद्यांवर बारीक लक्ष ठेऊन असतांना देखील मटक्याचा खेळ चालवणारे विविध शकली लढवून मटका चालवत असल्याने पोलिसांचीही डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. अवैध धंद्यांना पायबंद लावण्याकरिता पोलिस दिवसरात्र शहरात गस्त घालत आहे. अवैध धंद्यांची पाळेमुळे खणून काढण्याकरिता शहरात पोलिसांची शुद्ध मोहीम सुरु असतांना लालगुडा चौपाटी येथे मटका सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लालगुडा चौपाटी परिसरातील बसस्टँड मागे मटका खेळवला जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता काही इसम तेथे मटका खेळतांना आढळून आले. पोलिस आल्याचा सुगावा लागताच मटका खेळणारे सुसाट पळाले. तर मटका चालवणारा पोलिसांच्या हाती लागला. मटका जुगारावर पैशाचा खेळ खेळवतांना पोलिसांनी आरोपीला रंगेहाथ अटक केली. फारुख कदीर शेख (२४) रा. शास्त्रीनगर असे या मटका पट्टी फाडतांना अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मटक्याचा खेळ पूर्णतः बंद ठेवण्याच्या पोलिसांच्या आव्हानानंतरही काही मटका बहाद्दर मटका चालविण्याचे धाडस करीत असल्याने पोलिसही त्यांना चांगलीच अद्दल घडवू लागले आहेत. लपून छपून मटका चालवितांना अटक केलेल्यांची आता पोलिस स्टेशनमध्ये चांगलीच खातिरदारी केली जात आहे. पोलिसांच्या सूचनेनंतरही मटका खेळवणाऱ्यांकडून आव्हानात्मक भूमिका घेतली जात असल्याने पोलिसांनीही आता बाजीराव दाखवणे सुरु केले आहे. हातावर फटक्यांचा प्रसाद देऊन अवैध धंद्यांपासून तौबा करण्याची शिकवण पोलिसांनी देणे सुरु केले आहे. मटक्यावर टाकलेल्या धाडीत पोलिसांनी अँड्रोईड मोबाइलसह ८७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीवर मजुका च्या कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.