सह्याद्री न्यूज | रवि घुमे
मारेगाव : मुलं देवाघरची फुलं.ह्या म्हणीला साजेसं असं एक मुल मारेगांव तालूक्यातील येरमे गुरूजी यांच्या पोटी निपजलं,हे देवाचं फुल खरंच देवानंच धाडलं होतं. बंद दारात कोण उभं आहे हे विचिरायच्या अगोदरच देवानंद आला वाट्ते.अशी ओळख लहानपणी देवानंदनी करून ठेवली होती.कारण देवानंद दार ठोठावत नव्हता,तर देवानंद ची नैसर्गिक बोटं दारावरंही तबल्यावर थिरकल्या सारखीच दारावर थिरकत होती.म्हणुनच हा देवानंदच आहे,ही खात्री शेजारच्यांना होती.
देवानंद येरमे हा कुशल, यशस्वी,तरबेज,आणि काय काय. काय उपमा द्यावी हा ही पेचच आहे. कुठल्याही निमशास्त्रीय गायन प्रकारावर साथसंगत करण्याची कला परमेश्वराने साक्षात त्याला बहाल केली असाच प्रत्यय त्यांच्या वादनादरम्यान श्रोत्यांना येत होता.
तो निसर्गदत्त तबला वादक होता खरा,पण तो जिज्ञासूही होता,त्याने निसर्ग देणगीवरच अवलंबून न राहता परीसरातीलच वणीचे प्रसिद्ध तबलावादक व शिक्षक स्व.आबासाहेब कुचनकर व त्यांचे पुत्र श्री जयंत कुचनकर, श्री दिलीप हंसराज लोणारे गुरुजी यांचेकडून शास्त्रशुद्ध तबल्याचे धडे गिरवले.अजून पुन्हा काही हाती लागावं या जिज्ञासेपोटी देवानंद ने नागपूर चे स्व.ऊ.शेरू खां.साहेबांकडे गंडावंदन करून उच्च शिक्षणास सुरूवात केली.शिक्षणात बरीच प्रगती केली.पण तब्बेत काही साथ देईना.तब्बेतीने हडकुडा असला तरी जीवाच्या आकांताने त्याचे तबलावादन होते. खंजरी भजन स्पर्धेत त्याने तबलावादनात करवून आणलेले बदल आणि विशेषता नव्या पिढीच्या तबलावादकात आजही दिसत आहे.
असा गुणी शांत,संयमी तबलावादक वयाच्या अवघ्या चाळीशीत आई,पत्नी,एक मुलगा,भाऊ व असंख्य चाहत्या़ंना सोडून कायमचा निघून गेला. हे शल्य कधीच भरून नीघणारं नाही.
शेवटी राष्ट्रसंतांच्या ओळी आठवतात
"जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला"
अंत्यसंस्कारासाठी श्री सुरेन्द्र डोंगरे,प्रशांत होरे,नाना कुळसंगे,वासू धाबेकर, मंगलाताई ठक, रामदासजी पेंदोर, चंद्रकांत पेंदोर, सुनील गेडाम व विदर्भातील अनेक नामवंत कलाकारांची उपस्थिती होती.
श्री विठ्ठलराव गजभिये गुरुजी यांच्या उपस्थितीत शोकसभा पार पडली.
देवानंद! तू दुर दुर तेथे, हुरहूर मात्रं एथे.
अशा हुरहुन्नरी कलावंतांच्या पुण्यातम्याला शांती लाभो व येरमे कुटुंबाला ह्या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
देवाने धाडलेला मारेगांव चा देवानंद येरमे अनंतात विलीन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 06, 2022
Rating:
