सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे
वणी : मराठी भाषेचे साहित्य हे जागतिक स्तरावरील आहे. अमृतते पैजा जिंकण्याची क्षमता असलेल्या मराठी भाषेला दीड हजार वर्षांपेक्षा जास्त वर्षाचा इतिहास आहे. असे प्रतिपादन नगर वाचनालयाचे सचिव तथा राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी केले. ते तालुका विधी सेवा समिती द्वारा मराठी भाषा संवर्धन पधारवाड्या निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
येथील महसूल भवन मध्ये आयोजित करण्यात आलेली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील न्यायालयाचे सहायक अधीक्षक आर.सी. खोंडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून पी.यु. देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देशमुख यांनी केले.
न्यायालय व शासकीय कार्यालयात मराठी भाषेचा वापर या विषयावर पुढे बोलतांना कासावार म्हणाले की, सन १८८५ मध्ये राजाराम शास्त्री भागवत यांनी मराठी भाषेत दोन ग्रंथ लिहिले आहे. त्यातील मराठी भाषेची चिकित्सा हा अनमोल ग्रंथ आहे. या ग्रंथामुळे मराठी भाषा ही किती प्राचीन आहे. याचा अंदाज येतो. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर या राज्याच्या राजकारभाराची भाषा मराठीच असेल असे जाहीर करून २६ जानेवारी १९६५ पासून कायदा अमलात आणला. पण प्रत्यक्षात न्यायालयीन प्रक्रियेत व शासकीय कार्यालयात प्रत्यक्षात पूर्णपणे याची अंमलबजावणी झाली नाही. त्यात केंद्र शासनाच्या कार्यालयात अजून पावेत सर्रास इंग्लिश भाषेचा वापर होत आहे. सन २०११ मध्ये मराठी भाषा विभागाची निर्मिती करून शासनाने मराठी भाषा सवर्धनासोबत साहित्य निर्मितीला प्रोत्साहन दिले. सन २०१३ पासून मराठी भाषेला उर्जितावस्था प्राप्त करून 'मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा' साजरा करून विविध उपक्रम घ्यायला सुरुवात झाली. मराठी भाषेवर इंग्रजीचे आक्रमण झाले आहे. त्यातून आपल्यावर सांस्कृतिक आक्रमण सुद्धा झाले आहे. आज अशी स्थिती आहे की, मराठी भाषेचा वापर करा असा आदेश इंग्लिश भाषेतून दिल्या जातो. या पेक्षा अधिक वाईट स्थिती असूच शकत नाही. अशी खंत व्यक्त केली.
या प्रसंगी अधिवक्ता आर. डी. तेलंग यांनी मराठी भाषेच्या वापरासंबंधी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात खोंडे यांनी मराठी भाषेच्या वापराची सुरुवात प्रत्येकांनी स्वतःपासून करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. बी. लिखार यांनी केले. आभार शुभम निमकर यांनी मानले.
'मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा' निमित्त विविध उपक्रम साजरे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 02, 2022
Rating:
