सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी : पोलीसाचे नाव येताच सर्व सामान्यांच्या मनात धडकी भरते. पोलिसांची प्रतिमा जनतेच्या मनात तितकीशी चांगली नाही. मात्र मुकूटबन पोलिसांचं सामाजिक रुप पाहायला मिळालं. जवळपास मोडलेलं लग्न पोलिसांनी परत जुळवून वधू वराच्या रेशीम गाठी बांधल्या. त्यामुळे मुकूटबन पोलिसांचे परिसरात कौतुक होत आहे.
झरी जामणी तालुक्यातील लहान पांढरकवडा येथील बौध्द समाजाचे पंचफुलाबाई राजू आनंदराव वाळके यांची द्वितीय कन्या सपना व मारेगाव तालुक्यातील आकापुर येथील भावनाताई गौतम डेपुटी भरणे यांचे चिरंजीव प्रकाश या दोन्ही परिवारात दोन महिन्यांपूर्वी लग्नाचे नाते जुळले होते. काही पारिवारिक कारणांमुळे हे नाते तुटण्याच्या मार्गावर आले. त्यामुळे दोन्ही कुटुंबांत वितुष्ट निर्माण झाले. वडील हयात नाही मुलीच्या आईची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. लग्न मोडले तर मुलीचे काय होणार, या भीतीने त्यांची चिंता वाढली. त्यानंतर मुलीकडील आप्त संबंधातील माणसे घरी बैठक घेऊन बसले. यानंतर मुलीची आई पंचफुलाबाई, मुलगी सपना, सरपंच मधुकर राजूरकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे, अनिल पावडे व नातेवाईक शनीवारी (ता. २६) मुकूटबन पोलीस ठाण्यात पोहोचले.
सपनाची आई पंचफुलाबाई वाळके हिने आपली कैफियत ठाणेदार अजीत जाधव व पोलीस उप निरीक्षक अनिल सकवान यांचे समोर मांडली. कैफियत ऐकल्यानंतर ठाणेदार अजीत जाधव यांनी मारेगाव तालुक्यातील आकापुर येथील भरणे परिवाराला मुकूटबन ठाण्यात येण्यास सांगितले. हे दोन्ही परिवार एकत्र आल्यानंतर प्रकाश व त्यांच्या कुटुंबियाची ठाणेदार अजीत जाधव व पोलीस उप निरीक्षक अनिल सकवान यांनी दुपारी १२:०० ते ६:०० वाजेपर्यंत दोन्ही परिवाराचे समुपदेशन करून समजूत काढली. अखेर नवरदेव प्रकाश व भरणे परिवार तयार झाले. दुसरे दिवशी विवाहाचा विधी उरकण्याची तयारी सुरू झाली. या कार्यास लागणारा सर्व खर्च मुलामुलींना कपडे, मंगळसूत्र, जोडवे, हारतुरे, मिठाई व अल्पोपहारचा खर्च वाळके परिवार कडून करण्यात आला. शेवटी दोन्ही पक्षाच्या वऱ्हाडीच्या साक्षीने रविवारी संध्याकाळी ७:३० वाजता लहान पांढरकवडा येथे वधू मुक्कामी मंडपात विवाह सोहळा पार पडला.
बौध्द समाजाचे रितिरिवाज प्रमाणे मंगलाष्टके झाली, फुलांच्या अक्षता पडल्या, दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळ टाकली. हा अविस्मरणीय प्रसंग मुकूटबन पोलिस ठाण्याचे ठाणेदार अजीत जाधव व पोलीस उप निरीक्षक अनिल सकवान यांच्या समुपदेशन ने पार पडला. पोलीस उप निरीक्षक अनिल सकवान, पोलिस कर्मचारी मंगेश सलाम, दिलीप जाधव, संदीप बोरकर, संजय खांडेकर, संदीप कुमरे, सरपंच मधुकर राजूरकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे, व दोन्ही पक्षाकडील वऱ्हाडांच्या साक्षीने वधू-वर लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले.
तुटणाऱ्या लग्नाच्या मुकूटबन पोलिसांनी बांधल्या रेशीम गाठी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 28, 2022
Rating:
