सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : भावनिक गुंतागुंत, कौटुंबिक अडचणी, त्यात प्रेयसीचा हट्टीपणा या साऱ्या प्रश्नाभोवती फिरणारी 'क्षण..एक पुरे' ही मर्मस्पर्शी नाट्यकृती वणीच्या कलावंतांनी चंद्रपूर येथे सादर केली.
वैभवशाली सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या वणीच्या कलावंतांनी नुकतेच राज्य हौशी नाट्य स्पर्धेत चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात 'क्षण.. एक पुरे' हे दोन अंकी दर्जेदार नाटक सादर केले. लेखिका डा. माणिक वड्याळकर यांच्या सशक्त लेखणीतून साकारलेल्या या नाटकाची वणी येथील प्राचार्य हेमंत चौधरी यांनी निर्मिती केली.
मोठया भावाच्या निधनानंतर वैधव्य आलेली वहिनी,तिची चिमुकली मुलगी,जर्जर म्हातारपण आलेले वडील यांची मोठी जबाबदारी खांद्यावर असलेला चाळीशी पार पडलेला नाना उर्फ जय. कौटुंबिक जबाबदारी मध्ये गुरफटत जाणाऱ्या जय ची प्रेयसी तृप्ती ही खूप हट्टी असते. ती जय कडे लग्नाचा तगादा लावते. आपल्यामुळे आपल्या मुलाचे लग्न होत नाही आहे हे समजुन-उमजून जय चे वडील प्राण त्यागतात.या सर्व दुःख विवनंचनात जय ला पक्षाघात होतो.अश्या मर्मस्पर्शी पटकथा मध्ये वणीच्या कलावंतांनी आपल्या कसदार अभिनयाने जीव ओतला. सर्व अभिनेत्यांनी रसिकांना अक्षरशः भुरळ घातली.
प्राचार्य हेमंत चौधरी हे आपल्या विनोदी भूमिके बद्दल सर्वपरिचित आहेत,मात्र या नाटकात त्यांनी आपली ही रूढ झालेली चाकोरी मोडीत काढली. नाना उर्फ जय या धीरगंभीर भूमिकेत त्यांनी आपली अभिनय प्रतिभा सिद्ध करीत सर्वांना चकित केले. विशेषतः वयाच्या ७२ व्या वर्षी अशोक सोनटक्के यांनी जय च्या वडिलांची आव्हानात्मक भूमिका आपल्या दमदार अभिनयाने लीलया पार पाडली.
दिग्दर्शक शुभम उगले यांच्या या नाट्यकृती मध्ये सौ.मीना गिरीश वानखेडे,उमाकांत म्हसे,प्रा.सौ सीमा किशोर सोनटक्के,कु.राधा किशोर सोनटक्के,स्वप्नील दहिवलकर यांनी उत्तम अभिनय करून आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिला.
कथेला साजेसं संगीत देण्याचे काम अजित खंदारे यांनी पार पाडले. प्रत्येक प्रसंगाला उठावदार व जिवंत करण्यासाठी केविद्रनाथ बारसागडे यांनी उत्तम प्रकाश योजना आखली. नेपथ्यकार निलेश कुंभारे यांचे रंगमंच उभारण्यात मोलाचे योगदान राहीले. अनिता अशोक सोनटक्के यांनी रंगमंच सजावट केली. वेशभूषा सौ.प्रणिता हेमंत चौधरी यांनी तर रंगभूषा वैभव अरुण चौधरी यांची होती. केशभूषा मनू गिरीश वानखेडे यांनी केली. अंजना उत्तम बहुउद्देशीय संस्था. चिखलगाव (वणी) तर्फे हे नाटक सादर करण्यात आले.
उल्लेखनीय म्हणजे वणीमध्ये एकेकाळी समृद्धशाली नाट्यपरंपरा होती. कालांतराने ती लोप पावत गेली. मात्र पुन्हा एकदा येथील रंगमंच चळवळीला नवीन उभारी देण्याचे काम प्राचार्य हेमंत चौधरी व त्यांची चमू करीत आहे, हे निश्चितच एक आशादायी चित्र आहे.
नात्याचं भावबंध सांगणारी मर्मस्पर्शी नाट्यकृती, 'क्षण..एक पुरे'
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 28, 2022
Rating:
