मारेगाव : आपल्या मागेपुढे कोणी नाही अशी धारणा मनी बाळगून जीवनाला कंटाळलेल्या युवकाने गावाशेजारीच असलेल्या विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना मार्डी येथे घडली असून, सदर युवकाचे नाव मनोज प्रभाकर खोके (वय २८) असे आहे.
तालुक्यातील मार्डी येथील आईवडील नसलेल्या, आणि पोरका असलेल्या मनोजचे आईवडील लहानपणीच मरण पावले होते. दोन भाऊ होते, तेही वेगवेगळ्या आजाराने गेलेले होते. मनोज हा ग्रामपंचायतचे सफाईचे काम करायचा. तसेच हाताला मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करायचा असेच काम करीत असताना महिनाभरापूर्वी डाव्या हाताला जबर दुखापत झाली, परंतु जवळ रुपया नसल्याने हाताचा उपचार होऊ शकला नाही. त्यामुळे वेदना असह्य होऊ लागल्या व हाताला काम नसल्याने उपासमार सुद्धा होत होती यातूनच वैफल्यग्रस्त झाल्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा आहेत.
काल दुपारी तो आत्महत्या करण्याच्याच उद्देशाने गावाशेजारी असलेल्या विहिरीकडे गेला होता. तेथे विहिरीवर तो बसला होता. परंतु शेजारील शेतकऱ्याला तो तिथे दिसल्याने त्याने त्यास हाकलून लावले, तरीपण मनात सतत आत्महत्येचा विचार असलेल्या मनोजने रात्रीच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.