सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : कोरोना हा ओमायक्रॉन व्हेरिएन्ट घेऊन परत आल्याने शासन व प्रशासनाने आता चांगलीच धडकी घेतली आहे. कोरोनाने राज्यासह जिल्ह्यातही थैमान घातल्याने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. जिल्ह्यात नियम व बंधनं लागू करण्यात आली आहे. कोरोना संदर्भात शासनाने जारी केलेल्या नियमांचं आता नागरिकांकडून सक्तीने पालन करवून घेतल्या जात आहे. कोरोनाचा आणखी फैलाव होऊ नये म्हणून शासन व प्रशासनाने कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांमधील त्रिसूत्रीचं कटाक्षाने पालन करण्याचं आव्हान जनतेला केलं आहे. याच अनुषंगाने शासकीय कार्यालयात प्रवेश करतांना चेहऱ्यावर माक्स लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता बॅंकांमध्येही ग्राहकांना सरसकट प्रवेश न देता सामाजिक अंतर राखून तीन ते चारच जणांना आत जाऊ दिले जात आहे. आत सोडलेल्या ग्राहकांचे बँकेतील व्यवहार पूर्ण होईस्तोर बँकेचे दार बंद ठेवले जात आहे. पण बँकेच्या बाहेर मात्र ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. बँकेच्या बाहेर खातेदारांच्या रांगा दिसून येत आहे. ही रांग लावतांना कुठेही सामाजिक अंतर दिसून येत नाही. बँकेचा कोणताही कर्मचारी बाहेर रांगेत लागलेल्या ग्राहकांना सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना देतांना दिसत नाही. त्यामुळे बँकेच्या व्यवहाराकरिता आत सोडलेले ग्राहक बाहेर निघेपर्यंत ग्राहकांना बँकेच्या बाहेर रांग लावून तासंतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. आत गेलेल्या ग्राहकांचे बँकेचे व्यवहार झाले की नाही, यावर लक्ष ठेवण्याची तत्परताही कुणी दाखवायला तयार नसल्याने कित्येक वेळ ग्राहकांना बँकेच्या बाहेर ताटकळत उभे राहावे लागत आहे. अनेक वर्षांपासून काही शासकीय बँका विस्तारित जागेत स्थलांतरित न झाल्याने नागरिकांना बँकेच्या आत व बाहेरही उभे राहण्यास जागा कमी पडत आहे. बाहेर रहदारीच्या रस्त्यापर्यंत तर आतमध्ये एकमेकांना खेटून ग्राहकांची रांग लागतांना दिसते. दैनंदिन व्यवहाराकरिता तसेच पेन्शन, कर्ज व अनुदानाच्या रक्कमेकरिता बहुतांश ग्राहकांना बँकेत जावेच लागते. पण ग्राहकांना बँकेत कधी कधी उभे राहण्याचीही जागा मिळत नसल्याने त्यांना बाहेर पायऱ्यांवर व पटांगणात बँकेतील गर्दी कमी होण्याची वाट पहात बसावे लागते. काही शासकीय बँका ग्राहकांना सुविधा पुरविण्यास असर्मथ ठरत असल्याने बँकेशी जुळलेले ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. आता कोरोनाचे नियम पाळावे लागत असल्याने बँकेच्या दरवाजाबाहेर अगदी रहदारीच्या रस्त्यापर्यंत रांग लावावी लागत आहे.