सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : यवतमाळ जिल्हा हा राजकारणासाठी अत्यंत पोषक असा जिल्हा आहे. जिल्ह्याचा अध्यक्ष कधी प्रदेश अध्यक्ष होऊन जातो, कळतच नाही. न जानता न मागता यवतमाळ जिल्ह्याला काहीही मिळून जातं. याच उत्तम उदाहरण म्हणजे संध्याताई सव्वालाखे या आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्यानंतर त्या महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या आहेत. तसेच दुधात साखर पडावी तसे आमदार वजाहत मिर्जा हे विदर्भाचे सुपुत्र पहिल्यांदा वक्फ बोर्डाचे अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्हा व विदर्भात काँग्रेसचा भक्कम पाया तयार झाला असून येणारी निवडणूक ही काँग्रेसचीच राहणार आहे. सध्याचे दिवस काही चांगले नाहीत. विषारी असे हे दिवस आहेत. देशात विषारी विषमता माजली आहे. एकेकाळी ब्रिटिशांचे गुलाम असणारे लोक आता देशातील जनतेला गुलाम करू पाहत आहे. जाती धर्माचं राजकारण करून देशात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. निवडणुकी लढवताना जाती धर्माचा आधार घेतला जात आहे. काँग्रेसने कधी जाती धर्माचं राजकारण केलं नाही. आपला धर्मनिरपेक्ष बाणा जोपासून ठेवला. सर्वांनाच सामान संधी दिली. महिलांनाही सामान वागणूक दिली. त्यांनाही राष्ट्रपती पदापर्यंतचा सन्मान मिळवून दिला. असा हा समविचारी धोरणाचा काँग्रेस पक्ष असून या पक्षाने नेहमीच जनकल्याणाचा विचार केला आहे. आज जी विषारी विचारसरणी पसरविली जात आहे, त्या विषमता पसरविणाऱ्या विचारसरणीलाच सत्तेतून हद्दपार केले पाहिजे, असे खणखणीत विचार महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य अभिष्टचिंतन व पक्ष प्रवेश सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना व्यक्त केले. वसंत जिनिंग येथे हा अभिष्टचिंतन व पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बाळूभाऊ धानोरकर हे होते. खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणातून भाजपवर करकचून टीका केली. जाहिरातींवर भरमसाठ खर्च करून देशाची तिजोरी या सरकारने रिकामी केली आहे. चांगले दिवस आणण्याचे स्वप्न दाखवून अत्यंत वाईट दिवस या सरकारने आणले आहेत. महागाई व बेरोजगारीमुळे जनता बेजार झाली आहे. पूजापाठ करणारे सत्तेत आले असून त्यांनी जाती धर्माचं राजकारण करण्यापलीकडे दुसरे काहीही केले नाही. देशाची संपत्ती भांडवदारांच्या घशात घालण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी सुरु केलं आहे. साडेसात वर्षात भाजप सरकारने देशाला साडेसाती लावली आहे. या सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्यांमुळे झालेल्या शेतकरी आंदोलनात ७५० शेतकऱ्यांना वीरमरण आले. भरमसाठ आकारलेल्या जीएसटी मुळे छोट्या व्यापाऱ्यांवर अवकळा आली. हातांना कामे उरली नाही, नवीन उद्योग निर्माण झाले नाहीत. वर्षाला दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ म्हणणारं हे सरकार बेरोजगारांच्या फौजा तयार करू लागलं आहे. म्हणूनच आता यांच्या भुलथापांवर नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे नागरिक आता काँग्रेसकडे वळू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेले यश, हे नागरिकांची काँग्रेसप्रती असलेली विश्वासाहर्ता असल्याचे बाळूभाऊ धानोरकर यांनी आपल्या अनोख्या शैलीत बोलतांना म्हटले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी वामनराव कासावार यांनी नेहमी महिलांचे संघटन मजबूत करण्यावर भर देत महिलांना जोडून ठेवण्याची शैली त्यांना अवगत असल्याचे गौरव उद्दगार काढले. तसेच त्यांनी पंतप्रधान यांच्या महिलांविषयीच्या आक्षेपार्य वक्तव्याचा यावेळी निषेध केला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके, वाजहत मिर्जा यांनीही आपल्या भाषणातून हास्याचे फुलोरे फुलवितांनाच वामनराव कासावार यांच्या जीवनातील काही आव्हानात्मक व गंमतीजंमतीचे किस्से सांगितले. तसेच काँग्रेसला गळतीतून सबळतीकडे नेण्याची सर्वांचीच जबाबदारी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी मंचकावर काँग्रेसचे राहुल ठाकरे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, अरुणाताई खंडाळकर, ऍड. देविदास काळे, नरेंद्र ठाकरे हे विराजमान होते. प्रास्ताविक प्रा. टिकाराम कोंगरे यांनी केले. कार्यक्रम तब्बल दोन तास उशिरा सुरु झाल्याने उपस्थितांमध्ये नाराजी दिसून येत होती. यावेळी डॉ. महेंद्र लोढा यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा त्यांचा निर्णय अतिशय योग्य असून आता काँग्रेसमध्ये स्थिर रहा असा उपदेश काँग्रेस नेत्यांनी आपल्या भानातून त्यांना दिला. विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. काँग्रेसमध्ये प्रवेश घेणाऱ्यांचे स्वागत व नगर पंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार तब्बल एका तासापर्यंत चालला. त्यामुळे दूरवरून आलेल्या नागरिकांकरिता ठेवण्यात आलेल्या दुपारच्या जेवणाला सायंकाळ झाली. वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या अभिष्टचिंतन व पक्षप्रवेश सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.