वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्यास होणाऱ्या असुविध्येबाबत नागरिकांनी दिलेल्या निवेदनाची वैद्यकीय अधीक्षकांनी घेतली दखल
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वस्तीगृहात प्रवेश मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांना स्वास्थ प्रमाणपत्राची आवश्यक्ता असते. ते मिळण्याकरिता विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयात येतात. पण वैद्यकीय अधिकारीच पूर्ण वेळ रुग्णालयात उपस्थित रहात नसल्याने विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी अनेक विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयात चकरा मारतांना दिसतात. बाहेरगावचे विद्यार्थीही वैद्यकीय प्रमाणपत्रकारिता रुग्णालयाच्या येरझारा करीत असतात. वैद्यकीय अधिकारी उपस्थित रहात नसल्याने त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागतो. परिणामी त्यांच्या वेळेचा अपव्यय होऊन त्यांची अन्य शैक्षणिक कामे थांबतात. तसेच निराधार नागरिकांनाही वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागत असल्याने तेही वैद्यकीय प्रमाणपत्रकारिता ग्रामीण रुग्णालयाच्या चकरा मारत असतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थिती अभावी विद्यार्थी व निराधारांना स्वास्थ प्रमाणपत्र मिळण्याकरिता निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता काही सामाजिक कार्यकर्ते व सुज्ञ नागरिकांनी या समस्येचे निराकरण करण्याकरिता पुढाकार घेऊन वणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डि. एन. सुलभेवार यांना निवेदन देत वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याकरिता रुग्णालयात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती ठेवण्याची मागणी केली.
नागरिकांच्या निवेदनाची वैद्यकीय अधीक्षकांनी त्वरित दखल घेत सर्व ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विद्यार्थी व निराधारांच्या वैद्यकीय तपासण्या करून वेळेतच त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याच्या लेखी सूचना दिल्या. विद्यार्थी व निराधारांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांना रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागतात. ते त्यांना परवडण्यासारखे नाही. तेंव्हा वैद्यकीय प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागू नये, याची ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. अशा लेखी सूचना वणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलभेवार यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरिकांनी विद्यार्थी व निराधारांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्यास होणाऱ्या असुविधेबाबत दिलेल्या निवेदनाची वैद्यकीय अधीक्षकांनी तत्काळ दखल घेतल्याने सर्वांचेच समाधान झाले आहे.
निवेदनावर प्रकाश दुर्गे, मोरेश्वर देवतळे, देवानंद झाडे, अजय खोब्रागडे, प्रशांत गाडगे, रविंद्र कांबळे, रविंद्र तावाडे, अर्जुन शिरसाट, माणिक तावाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्यास होणाऱ्या असुविध्येबाबत नागरिकांनी दिलेल्या निवेदनाची वैद्यकीय अधीक्षकांनी घेतली दखल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 01, 2022
Rating:
