सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : महाराष्ट्र राज्याचे शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतीच जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांची नावे जाहीर केली. त्यामध्ये युवासेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते अजिंक्य शेंडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निष्ठावान कार्यप्रणालीची ही पावती असल्याचे बोलल्या जात आहे. त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना व समस्यांना वाचा फोडून आपल्या कार्यशैलीचा परिचय दिला. एका हाकेवर जनतेच्या समस्यांना घेऊन प्रशासनाला जाब विचारणारे कार्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून शहरात अजिंक्य शेंडे यांनी ओळख निर्माण केली आहे. तडफदार युवा शिवसैनिक म्हणून त्यांचं सामाजिक व राजकीय कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांची पदोन्नती करून त्यांच्या पक्षाप्रती असलेल्या निस्वार्थ भावनेची खऱ्या अर्थाने कदर केली आहे. त्यांना सामाजिक व राजकीय कार्य करतांना व सार्वजनिक विषय हाताळतांना राजकीय बळ मिळावं, हे त्यांच्या पदोन्नतीमागचं कारण असल्याची चर्चा आहे. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय पक्ष श्रेष्ठींना तर दिलेच आहे, पण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या मार्गदर्शनामुळे यशस्वी राजकीय प्रवास करू शकलो असल्याचेही त्यांनी प्रामुख्याने सांगितले आहे. तसेच यवतमाळ जिल्हा युवासेनेचे विस्तारक दिलीप घुगे यांनीही त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास दाखविल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. अजिंक्य शेंडे यांची युवासेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी लागलेली वर्णी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीची नांदी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे. त्यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कार्य आहेत. मग तो कोरोना काळात रुग्णांना रुग्णालयात ऑक्सिजन मिळवून देण्याकरिता केलेला खटाटोप असो की, अत्यवस्थ रुग्णांना घरपोच ऑक्सिजन सिलेंडर पोहचविण्याचा उपक्रम असो. त्याच्या त्या जोखीम पत्कारून केलेल्या कार्याची सर्वच स्तरातून प्रशंसा झाली. एवढेच नाही तर त्याच्या तत्परतेमुळे एसटी महामंडळाच्या बसची होणारी दुर्घटना टळल्याने त्याचा मोठा गौरव करण्यात आला होता. एसटी मध्ये प्रवास करणाऱ्या कित्येकांचे त्याच्या समय सूचकतेमुळे जिव धोक्यात येण्यापासून वाचले. असा हा अजिंक्य कार्य तत्परतेमुळे व अनोख्या कार्यपद्धतीमुळे सर्वांच्याच विश्वासास पात्र ठरू लागला आहे. त्याच्या या निवडीमुळे त्याच्या निस्वार्थ कार्याची जाण असलेल्या प्रत्येकांनीच त्याच कौतुक केलं आहे.