सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
तालुक्यातील मेंढोली या गावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असून अवैध दारू विक्रेत्यांकडून राजरोसपणे दारू विकली जात आहे. गावात हवी तेंव्हा दारू मिळत असल्याने नशा करण्याचे प्रमाण वाढू लागल्याने गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी सातत्याने होऊ लागली. गावकऱ्यांनी तशा तक्रारीही पोलिस स्टेशनला केल्या. गावकऱ्यांनी वेळोवेळी अवैध दारू विक्री बंद करण्याबाबत तक्रारी देऊनही दखल न घेण्यात आल्याने शेवटी ग्रामपंचायतेनेच गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याचा ठराव घेतला. मेंढोली या गावात अवैध दारू विक्रीला उधाण आल्याच्या बातम्या न्यूज माध्यमांतुन झळकल्या. १६ जानेवारीला एका न्यूज पोर्टललाही मेंढोली येथीलच पत्रकार विवेक जगन्नाथ पिदूरकर यांनी गावातील अवैध दारू विक्रीची बातमी लावली. याचा राग मनात धरून गावातील अवैध दारू विक्रेता मयूर पुरुषोत्तम कावडे (२६) याने सदर पत्रकाराला माझी अवैध दारू विक्रीची बातमी का लावली, म्हणून शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर तो चालून आला. तसेच यानंतर माझी अवैध दारू विक्रीची बातमी पेपरला दिल्यास जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली. अवैध दारू विक्रेते खुल्या धमक्या देऊन पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू लागल्याबददलची तक्रार विवेक पिदूरकर यांनी शिरपूर पोलिस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अवैध दारू विक्रेत्याविरुद्ध ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
गावांमध्ये अवैधरित्या दारू विकून गरीब गावकऱ्यांना व्यसनाचा मार्ग दाखविणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांची मजल आता त्यांच्या विरुद्ध उठणारा आवाज दाबण्यापर्यंत जाऊ लागली आहे. शेतकरी, शेत मजूर व रोजमजुरी करणाऱ्यांना व्यसनाधीन करणाऱ्या या अवैध दारू विक्रेत्यांच्या तक्रारी करूनही त्यांच्यावर कार्यवाही होत नसल्याने ते आता चांगलेच निर्ढावले आहेत. गावात मनसोक्त दारू मिळत असल्याने व हऱ्याच्या संगतीने नाऱ्याही दारूचे व्यसन करू लागल्याने तरुण पिढी व्यसनाधीन होऊ लागली आहे. दारूचे व्यसन जडल्याने व गावातच मुबलक दारू मिळत असल्याने घरातील कर्ते पुरुष व तरुण मंडळी रोजंदारीवर न जाता दारूच्याच व्यसनात लिन राहतांना दिसत आहे. गाव खेड्यात अवैध दारू विक्री जोमात सुरु असल्याने पावलोपावली दारू उपलब्ध होते, त्यामुळे दारू पिणाऱ्यांचे नशा करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. गावात अवैध दारू विक्री सुरु असल्याच्या अनेक तक्रारी गावकऱ्यांनी केल्या आहेत. पण त्यांच्या तक्रारीची कधी दखलच घेण्यात आली नाही. मेंढोली या गावात अवैध दारू विक्रीला अक्षरशः उधाण आल्याने न्यूज माध्यमांवर बातम्या झळकल्या. आता बातम्या देणाऱ्या पत्रकारांनाच जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांचा आवाज दाबण्याचा हे अवैध दारू विक्रेते प्रयत्न करू लागले आहे. पत्रकारांच्या जीवावर उधाणाऱ्या या अपप्रवृतींच्या वेळीच मुसक्या आवळण्याची गरज असून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील पत्रकारांनी केली आहे.
अवैध दारू विक्रेत्याकडून पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी, मेंढोली येथील घटना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 18, 2022
Rating:
